पुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले
ड्रेनेज लाईनचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून खड्ड्यात गाडल्या गेलेल्या मजुराचा मृत्यू झाला, तर बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानालाही प्राण गमवावे लागले

पुणे : ड्रेनेज लाईनचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून खड्ड्यात गाडल्या गेलेल्या मजुराचा मृत्यू झाला, तर बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानालाही प्राण गमवावे लागले. पुण्यात पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी भागात (Pune Dapodi Drainage Accident) हा दुर्दैवी प्रकार घडला.
ड्रेनेज लाईनचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने तीन मजूर पंधरा ते वीस फूट खोल खड्डयात अडकले होते. त्यापैकी दोघा मजुरांना बाहेर काढण्यात आलं. मात्र 22 वर्षीय नागराज जमादार या मजुराचा मृत्यू झाला. तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील विशाल जाधव या अग्निशमन दलाच्या जवानालाही बचावकार्यादरम्यान प्राण गमवावे लागले. निखिल गोगावले, सरोज पुंड हे जवान आणि ईश्वर बडगे, सीताराम सुरवसे हे मजूर जखमी आहेत.
एनडीआरएफ, अग्निशमन दल, आणि पोलिसांना तब्बल बारा तासांच्या परिश्रमाननंतर मजुराचा मृतदेह बाहेर काढता आला. रविवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
काय झालं होतं?
दापोडी येथील पाण्यात टाकीजवळ गेल्या दीड वर्षांपासून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला हे काम देण्यात आलेले आहे. हे काम करत असताना इथे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप केला जात आहे.
या घटनेनंतर महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात कोण दोषी आहे हे पाहण्यासाठी दोन शहर अभियंत्यांची चौकशी नेमण्यात आली असल्याचं हर्डीकर यांनी सांगितलं.
दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्यावर बघ्यांची एकच गर्दी झालेली होती. ज्यावेळी विशाल जाधव, सरोज पुंडे, निखिल गोगावले हे मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी खड्ड्यात उतरले. त्यांनी ईश्वर बडगे, सीताराम सुरवसे यांना बाहेर काढले. नागराजला बाहेर काढत असताना वरती उभ्या असलेल्या बघ्यांमुळे त्यांच्या अंगावरही मातीचा ढिगारा कोसळला.
माझ्या मुलाला जाळून टाका, हैदराबाद गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या आईची मागणी
त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना बचावकार्यासाठी बोलवण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांना दोन तासांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढता आले. पण तोपर्यंत जाधव यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तब्बल आठ तासांनी मजूर नागराज याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामे (Pune Dapodi Drainage Accident) सुरु आहेत. मात्र, ही कामे सुरु असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. यातील दोषी ठेकेदारावर कारवाई होईल तेव्हा होईल, पण दोघांना आपला नाहक जीव गमवावा लागल्यामुळे चीड व्यक्त केली जात आहे. या दोघांच्या कुटुंबांचा आधार संपल्यानंतर तरी महापालिका प्रशासन जागं होईल का, हा प्रश्न विचारला जात आहे.