देशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जलप्रलय, महाराष्ट्रात सर्वात गंभीर स्थिती

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Aug 09, 2019 | 7:27 PM

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा (Flood in Maharashtra) घेण्यात आला. सर्व आवश्यक साहित्यासह एनडीआरएफच्या 83 टीम आणखी पाठवण्यात आल्या असल्याचं विभागाच्या महासंचालकांनी सांगितलं.

देशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जलप्रलय, महाराष्ट्रात सर्वात गंभीर स्थिती

नवी दिल्ली : देशातील चार राज्यांमध्ये पुराने हाहाःकार (Flood in Maharashtra) माजवलाय. केंद्रीय गृहमंत्रालयाने या परिस्थितीचा आढावा घेत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये 83 एनडीआरएफची पथकं पाठवली आहेत. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा (Flood in Maharashtra) घेण्यात आला. सर्व आवश्यक साहित्यासह एनडीआरएफच्या 83 टीम आणखी पाठवण्यात आल्या असल्याचं विभागाच्या महासंचालकांनी सांगितलं.

एनडीआरएफच्या या टीम नौसेना, वायूसेना आणि तटरक्षक दलाच्या विविध 173 टीमसोबत मिळून बचावकार्य करतील. गृहमंत्री अमित शाहांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाला आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुजरात, महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. तर गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

देशभरात पावसाचा हाहाःकार

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातलंय. पुणे विभागात आतापर्यंत 2 लाख 85 हजारांपेक्षा जास्त लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. आतापर्यंत एकूण 29 जणांचा मृत्यू झालाय, तर शेकडो जनावरंही दगावली आहेत.

कोल्हापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटकातही पुराने हाहाःकार माजवलाय. पुरात आतापर्यंत 71 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावलाय, तर दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

केरळमध्ये गेल्या दोन दिवसात 22 जणांचा मृत्यू झालाय. प्रशासनाने 22 हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. लोकांनी घाबरु नये आणि प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन केरळ सरकारकडून करण्यात आलंय.

उत्तर प्रदेशलाही पुराचा फटका बसलाय. विविध नद्यांनी धोक्याची पाणी पातळी ओलांडली असून मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे हजारो लोकांनी स्थलांतर केलंय, तर मध्य प्रदेशातही हीच परिस्थिती आहे.

हिमाचल प्रदेशात भूस्खलन झाल्यामुळे 255 रस्ते पूर्णपणे बंद आहेत. गोव्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI