रेमेडेसिवीर आणि इतर औषधांच्या विक्रीसंदर्भात प्रशासनाने काटेकोर नियंत्रण ठेवावे : यशोमती ठाकूर

रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

रेमेडेसिवीर आणि इतर औषधांच्या विक्रीसंदर्भात प्रशासनाने काटेकोर नियंत्रण ठेवावे : यशोमती ठाकूर
Yashomati Thakur

अमरावती : खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. अमरावतीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 2 हजार360 रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी एक औषध केंद्रही निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. (Government should strictly control the sale of remedicivir and other drugs Says yashomati Thackur)

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत, असं ठाकूर म्हणाल्या.

राज्यामध्ये 59 औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात 5, कोकण विभागात 10, नागपूर विभागात 6, औरंगाबाद विभागात 11, नाशिक विभागात 9, बृहन्मुंबई विभागात 5 आणि पुणे विभागात 13 औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत. अमरावती येथे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र निश्चित करण्यात आले असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात चाचणी दर, तपासणी, ऑक्सिजन वाहतूक याबाबत यापूर्वीच दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोना संदर्भातील कोणत्याही लसीबाबतची किंवा औषधांबाबतची कृत्रिम टंचाई कुठेही जाणवता कामा नये. कुठेही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश यशोमती ठाकूर यांनी दिले.

खासगी रूग्णालयामध्ये दाखल रूग्णांसाठी रेमडेसिविरची किंमत 2 हजार 360 रूपये निश्चित करण्यात आली आहे. रेमडेसिविर पुरवण्यासाठी परवानगीसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा मुख्यालयासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व इतर शहरांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किंवा त्यांनी नेमलेले वैद्यकीय अधिकारी सक्षम असतील. लसीचा शिल्लक साठा व पुरवठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल अधिकारी नेमण्यात येत आहे.

इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.

(Government should strictly control the sale of remedicivir and other drugs Says yashomati Thackur)

संबंधित बातम्या

मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा, पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी तीन महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती

मुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी

गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, भाजप आक्रमक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI