पुणे विभागात पावसाचे थैमान, 27 जणांचा मृत्यू, तर 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Aug 08, 2019 | 11:19 PM

पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातला आहे. पुणे विभागात देखील पूर परिस्थितीचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे पुणे विभागात आतापर्यंत तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. यात आतापर्यंत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 ते 6 जण अजूनही बेपत्ता आहेत.

पुणे विभागात पावसाचे थैमान, 27 जणांचा मृत्यू, तर 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातला आहे. पुणे विभागात देखील पूर परिस्थितीचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे पुणे विभागात आतापर्यंत तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. यात आतापर्यंत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 ते 6 जण अजूनही बेपत्ता आहेत.

नागरिकांच्या मदतीसाठी सैन्य, नौदलासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाची (NDRF) 77 पथकं मदत आणि बचाव कार्य करत आहेत. यात 845 जवान आणि 114 बोटी नागरिकांचे स्थलांतर करत आहे. या स्थितीत वीज पुरवठा खंडित असल्याने तब्बल 4 लाख नागरिकांना फटका बसला आहे. पुरपरिस्थितीमुळे तब्बल 204 रस्ते बंद आहेत. कोल्हापूरचा आजही इतर रस्त्यांशी संपर्क तुटलेला आहे. बंगळुरु-मुंबई महामार्गही बंद आहे. त्यामुळे एसटी वाहतूक देखील ठप्प आहे. अनेक गावांचा पाणीपुरवठा अजूनही बंद आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या आपत्तीमध्ये कोट्यावधी रुपयांची वित्तहानी झाली असून आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एकूण स्थलांतरित – 2,05,591

सांगली – 80,319
कोल्हापूर – 97,102
सातारा – 7,085
पुणे – 13,336
सोलापूर – 7,749

पुरातील मृतांची संख्या एकूण 27

सांगली – 11
कोल्हापूर – 2
सातारा – 7
पुणे – 6
सोलापूर – 1

पुणे विभागात आतापर्यंत सरासरी 779 मिलीमीटर पाऊस

एकूणच पुणे विभागात यावेळी पावसाने उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 225 टक्के पाऊस, सातारा जिल्ह्यात 180 टक्के, पुणे जिल्ह्यात 168 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 123 टक्के तर सोलापूर जिल्ह्यात 78 टक्के पाऊस पडला आहे. पुणे विभागात 58 पैकी 30 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

पुणे विभागातील एकूण 58 तालुक्यांपैकी 28 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

पुणे विभागात एकूण 58 तालुके आहेत. त्यापैकी 28 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात सांगलीच्या मिरज, वाळवा, शिराळा, पलुस या 4 तालुक्याचा, कोल्हापूरच्या सर्व 12 तालुक्यांचा समावेश आहे. साताऱ्यात सातारा, कराड, पाटण, वाई या 4 तालुक्यांमध्ये, तर पुण्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबिगाव, शिरुर, खेड या 8 तालक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, कागल आणि चंदगड या 5 तालुक्यात आणि सातारा जिल्हयातील 2 तालुक्यांमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली.

धरणातील पाणीसाठा

पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व धरणं 100% भरली आहेत.
मदत आणि बचाव कार्य

सांगली

सांगली जिल्हयामध्ये एकूण 21 पथकं आहेत. त्यात 318 जवान आणि 41 बोटींचा समावेश आहे. 8 NDRF ची पथकं असून त्यात 190 जवान आणि 26 बोटींचा समावेश आहे. मुंबई येथील NDRF ची पथकं देखील सांगलीला रवाना होत आहेत.
सैन्याच्या 54 बोट देखील मदत आणि बचावकार्य करत आहेत. नौदलाची 11 पथकं देखील पूरगस्त भागात पोहचली आहेत. त्यात 54 जवान आणि 12 बोटींचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाची 11 पथकं (54 कर्मचारी आणि 12 बोटी), सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाच्या 20 बोटी देखील सांगलीतील बचाव कामासाठी रवाना झाल्या आहेत. कोस्ट गार्डचंही 1 पथक (20 जवान) या कामात सहभागी झालं आहे.

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात 481 जवानांचा आणि 63 बोटींसह एकूण 48 पथकं मदत आणि बचावकार्य करत आहेत. यात सैन्याची 4 पथक (106 जवान आणि 2 बोटी), नौदलाची 14 पथकं (70 जवान आणि 14 बोटी), जिल्हा प्रशासनाची 21 पथकं (127 कर्मचारी 23 बोटी), इतर 7 पथकांचा (140 जवान आणि 20 बोटी) समावेश आहे.

सातारा

सातारा जिल्हयामध्ये एकूण 8 पथकं आहेत. यात 46 जवान आणि 10 बोटींचा समावेश आहे.

वीज संकट

पुणे विभागातील 11 हजार 61 ट्रान्सफार्मर पावसाने बाधित आहेत. त्यामुळे एकूण 3 लाख 96 हाजर 737 वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे.

रस्ते

पुणे विभागात एकूण 204 रस्ते बंद आहेत. यात सांगलीतील 47, कोल्हापूरमधील 86, साताऱ्यातील 12, पुण्यातील 32 आणि सोलापूरमधील 27 रस्त्यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 6 प्रमुख राज्यमार्ग आणि 15 जिल्हामार्ग आहेत. हे सर्व मार्ग पाण्याखाली गेलेले आहेत. कोल्हापूर जिल्हयात 29 राज्यमार्ग आणि 57 प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण 86 रस्ते बंद आहेत.
सातारा जिल्हयामध्ये 8 पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथे काही पर्याची मार्ग उपलब्ध आहेत.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI