मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरच शांततेवर चर्चा शक्य : इम्रान खान

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरच शांततेवर चर्चा शक्य : इम्रान खान

इस्लामाबाद : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर पुन्हा सत्तेत आले, तरच भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेबाबत चर्चा होऊ शकेल, असा विश्वास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केला. परदेशी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी हा विश्वास व्यक्त केला. भारतातील निवडणुकांमध्ये विरोधीपक्ष काँग्रेस सत्तेत आला, तर कदाचित हिंदुत्ववाद्यांच्या भीतीने ते काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करणं टाळतील, असं इम्रान खान म्हणाले.

भाजप सत्तेत आल्यास काश्मीरच्या मुद्यावर तोडगा निघू शकतो, असा विश्वास इम्रान खान यांना वाटतो. मात्र त्याचवेळी इम्रान यांनी भारतीय मुस्लिमांबद्दल भीतीही व्यक्त केली.

मोदींमुळे काश्मिरी मुस्लिम आणि भारतातील मुस्लिम चिंतीत आहेत. काही वर्षांपूर्वी भारतीय मुस्लिम हे भारतात आनंदाने राहत होते. मात्र, आता त्यांना वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे त्यांच्या वास्तव्याची चिंता आहे, अशी भीतीही इम्रान खान यांनी व्यक्त केली.

मोदींची बेंजामीन नेतन्याहूंसोबत तुलना

इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना इस्राएलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्यासोबत केली. मोदींचं राजकारण हे भीती आणि राष्ट्रवादावर अवलंबून आहे, असे इम्रान खान म्हणाले. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात काश्मीरमधील विशेष अधिकार म्हणजेच 35-ए काढण्याचं आश्वासन दिलं. यावर टीका करत इम्रान म्हणाले, ही निवडणुकीसाठीची घोषणा असू शकते. पण, भाजप जर खरंच असं करण्याच्या विचारात असेल, तर हा चिंतेचा विषय आहे.

‘एअर स्ट्राईकनंतरही मोदीचं पंतप्रधान हवे’

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील दहशतवादी तळावंर एअर स्ट्राईक केला. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने ती विमानं हुसकावून लावत त्यांचं F 16 हे विमान पाडलं. मात्र त्याचवेळी भारताचा वैमानिक विंग कमांडर अभिनंदन हा पाक हद्दीत सापडला. त्याला  पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर भारताच्या प्रयत्नानंतर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. यादरम्यान पाकिस्तानकडून भारतावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली. इतक्या सगळ्या घडामोडींनंतरही पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपच पुन्हा सत्तेत यायला हवी, तरच काश्मीरच्या चर्चेला प्राधान्य दिलं जाईल, असं म्हटलं आहे.

भारतात 11 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात उद्या 91 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI