मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळले, बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा

माझ्या प्रदेशाला हरवून जिंकू, असं भाजपला वाटत असेल, पण ते कधीच करू शकणार नाहीत, असा घणाघातही कमलनाथ यांनी केला. (Madhya Pradesh CM Kamalnath resigns)

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळले, बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा

भोपाळ : मध्य प्रदेशात उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर काँग्रेस सरकार कोसळलं. बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन कमलनाथ यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार असल्याचं जाहीर केलं. (Madhya Pradesh CM Kamalnath resigns)

‘बंगळुरुमध्ये ज्या ठिकाणी आमदारांना ओलीस ठेवले जात आहे, त्या घटनेमागील सत्य या देशातील लोक पाहू शकतात. सत्य बाहेर येईल. जनता त्यांना माफ करणार नाही’ असं कमलनाथ म्हणाले. माझ्या प्रदेशाला हरवून जिंकू, असं भाजपला वाटत असेल, पण ते कधीच करू शकणार नाहीत, असा घणाघातही त्यांनी केला.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ सरकारकडे बहुमत नसल्याने सरकार टिकणे अवघड असल्याचे आधीच कबूल केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याचे आदेश काल (गुरुवारी) दिले होते. घोडेबाजाराला चालना दिली जाऊ नये, यासाठी न्यायालयाने फ्लोअर टेस्टचे नियम जारी केले होते. 22 पैकी केवळ 6 आमदारांचा राजीनामा स्वीकारण्याच्या सभापतींच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर, कालच अन्य 16 बंडखोर आमदारांचे राजीनामेही मंजूर झाले.

‘यावेळी भाजपने घोडेबाजार नाही, हत्तीबाजार केला. पण आम्ही बहुमत सिद्ध करु. आमच्याकडे ‘फॉर्म्युला 5’ आहे. दुपारी 12 वाजता (मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत) खुलासा केला जाईल, की आमच्या 16 आमदारांना कसे बंदीवान केले गेले, असा दावा मध्य प्रदेशचे मंत्री आणि काँग्रेस आमदार पीसी शर्मा यांनी केला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (शुक्रवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंत फ्लोअर टेस्ट पूर्ण करावी लागणार होती. न्यायालयाने बहुमत चाचणी दरम्यान हात उंचावणे, मतदान करणे आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करण्यासही सांगितले होते. बंडखोर आमदारांची सुरक्षा निश्चित केली जावी, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. परंतु बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.

20 मार्च रोजी मध्य प्रदेश विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘सत्य अस्तित्त्वात आहे’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

मध्य प्रदेश विधानसभेमधील सध्याचे गणित काय?

मध्य प्रदेश विधानसभेतील 230 पैकी 2 आमदारांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. 228 जागांपैकी 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर 206 जागा शिल्लक आहेत. अशावेळी बहुमत सिद्ध करण्याचा आकडा 104 होतो. कॉंग्रेसकडे आधी 114 आमदार होते. मात्र आता सभापतींसह 92 आमदार आहेत. सपा, बसप आणि अपक्ष आमदार धरता हा आकडा केवळ 99 पर्यंत पोहोचतो. तर भाजपकडे 107 आमदार आहेत. अशा परिस्थितीत भाजपा सध्याच्या संख्याबळाच्या जोरावर सरकार बनवू शकते. (Madhya Pradesh CM Kamalnath resigns)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI