लानत है उनपे, जिनके पास दानत नहीं, पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बॉलिवूडला मनसेच्या कानपिचक्या

अनिश बेंद्रे

Updated on: Aug 12, 2019 | 1:00 PM

कोल्हापूर-सांगलीतील जनता पूरपरिस्थितीचा सामना करत असताना, महाराष्ट्राला कर्मभूमी मानणाऱ्या बॉलिवूडकरांनी त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवल्याचं मनसेने म्हटलं आहे

लानत है उनपे, जिनके पास दानत नहीं, पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बॉलिवूडला मनसेच्या कानपिचक्या

मुंबई : कोल्हापूर-सांगलीला बसलेला महापुराचा विळखा सैल होत असला, तरी समस्या आणि आव्हानांचा पूर कायम आहे. अशातच राज्याच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून राजकारणी आणि मराठी कलावंत आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत पूरग्रस्तांना मदत देऊ करत आहेत. मात्र बॉलिवूडमधील कलाकारांना पूरग्रस्तांचा विसर पडल्याचा आरोप मनसेने केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रक जारी करुन बॉलिवूड कलाकारांनी पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष केलं असल्यावर बोट ठेवलं आहे. ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’ असं म्हणत मनसेने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

“समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण… महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत?” असा प्रश्न मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन विचारण्यात आला आहे.

‘पश्चिम महाराष्ट्रात पुराचं संकट आलं, मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार एकत्र आले. अतिशय नियोजनपूर्वक मदतसामुग्री पोहचवण्याची व्यवस्था केली. पुराचं पाणी ओसरु लागल्यावर आता खरं आव्हान आहे चिखल झालेले संसार सावरण्याचं… महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनेही आर्थिक स्वरुपात असेल किंवा गायींच्या चाऱ्याच्या स्वरुपात असेल, मदत रवाना केलेली आहे. समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणा बघून सगळेच भारावलेत, पण… हा ‘पण’ त्रास देतोय…’ असं मनसेने म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून जे सांगतात. ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दुःखात आहेत, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही?’ अशा शब्दात मनसेने संताप व्यक्त केला आहे.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली भागात जनजीवन उद्ध्वस्त  झालं आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पाठवा, असं आवाहन मनसेच्या विविध शाखांतर्फे करण्यात आलं होतं.

अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

यापूर्वी, राज्यातील पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.

राज्य सरकारसह अनेक संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट मदत करत आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी पूरग्रस्त भागात 5 कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.

संबंधित बातम्या :

जाणिवा जीवंत असणारे रिअल हिरो, पूरग्रस्तांना मदतीचा हात

महापुराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

दुष्काळात रेल्वेने पाणी; आता लातूरकडून सांगलीच्या उपकाराची परतफेड!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI