रखरखत्या उन्हात बैलांकडून क्षमतेपेक्षा जास्त काम, नागपुरात गुन्हा दाखल

रखरखत्या उन्हात बैलांकडून क्षमतेपेक्षा जास्त काम, नागपुरात गुन्हा दाखल

नागपूर : प्रखर उन्हात बैलांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त  काम करवून घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पशूप्रेमींच्या तक्रारीवरुन नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये   दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 8 दिवसांपासून नागपूर शहरात सूर्य आग ओकत आहे. अशा भीषण उन्हात सर्वसामान्य नागपूरकर स्वतःचे रक्षण करण्यात कमी पडत आहेत. तापमानाचा पारा वाढल्याने शहरात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

अंगाची लाही-लाही करणाऱ्या अशा भीषण उन्हात नागपूरकर दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही नागपुरातील दोन बैल गाडीचालक  बैलांकडून, त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहण्याचं काम करवून घेत असल्याची माहिती, पीपल्स फॉर अॅनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार या संस्थेच्या सदस्यांनी थेट जाऊन याबाबतची शहा-निशा केली. त्यावेळी त्यांना धक्कादायक माहिती मिळाली.

भर उन्हात दोन बैल एक बैलगाडी ओढत होते, त्या गाडीत तब्बल दीड हजार किलो वजनाचे लाकूड ठेवलेले दिसून आले. त्यानंतर पीपल्स फॉर अॅनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांनी थेट लकडगंज पोलीस स्टेशन गाठून, बैलगाडी मालकाविरुद्ध आणि माल वाहून नेणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.

पशूप्रेमींकडून मिळालेल्या तक्रारीला पोलिसांनी गांभीर्याने घेत घटनास्थळ गाठलं, घटनेची पाहणी केली आणि  अॅनिमल अॅक्टनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

नागपूरच्या रखरखत्या उन्हात माणसाचा जीव पाणी पाणी करतो आहे. अशात मुक्या जनावरांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम, तेही भर उन्हात करवून घेतलं जात आहे. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेत पोलिसांनी आणि प्राणी प्रेमींनी उचललेल्या या पावलाचं सर्वत्र स्वागत होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI