मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात या तारखेपासून बदल, पाहा काय घेतला निर्णय
मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. दरवर्षी ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वे आपल्या वेळापत्रकात बदल करीत असते. अलिकडे मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक घसरले असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातून हा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने आपल्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे वेळापत्रक 5 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यात वेळापत्रकात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या 10 जलद लोकलना दादर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर लोकलचे देखील वेळापत्रक बदलणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसचा भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीत प्रवास संपणाऱ्या दहा लोकलना ( 10 अप आणि 10 डाऊन ) दादर स्थानकात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लोकल आता दादरवरुन सुटतील आणि दादरला त्यांचा प्रवास समाप्त होईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत सीएसएमटी स्थानकाबाहेर अनेकदा लोकल ट्रेन फलाट रिकामा होण्याची वाट पाहात उभ्या असतात. त्यामुळे प्रवाशांचा नाहक वेळ जातो. त्यातच सीएसएमटीत 254 जलद लोकल सुटतात किंवा त्यांचा प्रवास संपत असतो. परंतू फलाटांची संख्या मर्यादीत असल्याने लोकल उभ्या राहतात , त्यामुळे सीएसएमटीतील जलद लोकलची संख्या कमी करुन दहा जोडी ट्रेन सीएसएमटीहून दादर स्थानकात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलची ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारेल आणि सीएसएमटी येथील लोकलचा प्रतीक्षा वेळ कमी होईल असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
प्रवाशांची सोय होणार, 5 ऑक्टोबरपासून बदल
या निर्णयाने सीएसएमटी येथील गर्दी कमी होऊन दादर येथील प्रवाशांना जादा गाड्या उपलब्ध होतील आणि दादर येथील गर्दीवर उतारा मिळेल असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. या महत्वाच्या बदलासह काही लोकलचा विस्तार देखील करण्यात येणार आहे. तर अनेक ट्रेनच्या नेहमीच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. या नवीन संभाव्य बदलामुळे प्रवाशांची सोय होईल आणि एकूण लोकलच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. मध्य रेल्वे आता 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बदलांची तयारी करत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.