पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5 वर, दाम्पत्याच्या मुलीसोबत चालक आणि नातेवाईकालाही संसर्ग

कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही मोठा शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता 5 वर पोहचली आहे (Corona infected patient in Pune).

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5 वर, दाम्पत्याच्या मुलीसोबत चालक आणि नातेवाईकालाही संसर्ग

पुणे : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही मोठा शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता 5 वर पोहचली आहे (Corona infected patient in Pune). दुबईहून आलेल्या दाम्पत्यानंतर आता त्यांच्यासोबतच्या आणखी तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांमध्ये आधीच्या रुग्णांच्या मुलीसह त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या ओला कार चालकाचाही समावेश आहे. संबंधित दाम्पत्य नुकतेच दुबईहून आले होते. ते दुबईहून मुंबईला विमानाने आले. त्यानंतर मुंबईहून त्यांनी ओला करुन पुण्यापर्यंतचा प्रवास केला. या प्रवासात त्यांच्यासोबतच्या चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या मुलीलाही आई-वडिलांकडून कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या व्यतिरिक्त या दाम्पत्यासोबत फिरायला गेलेल्या अन्य एका व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोनाचा झपाट्याने होणारा हा संसर्ग लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरु असून प्रकृती स्थिर आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याही तपासण्यात करण्यात येत आहेत.

पती-पत्नीसोबत मुलगी आणि चालकालाही कोरोनाचा संसर्ग

यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “आधी केवळ दुबईहून आलेल्या पती-पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या त्यांच्या मुलीला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ते दुबईहून मुंबईला आल्यावर मुंबईहून पुण्याला कॅबने आले. त्या ओला कॅबच्या चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चौघांची स्थिती स्थिर आहे. त्यांच्या माईल्ड स्वरुपाचा कोरोना प्रादुर्भाव झाला आहे.”

ओला चालकाच्या संपर्कातील इतर प्रवाशांचीही तपासणी होणार

या दाम्पत्यासोबत विना टूर अँड ट्रॅव्हल्सच्यावतीने जवळपास 35-40 लोक फिरायला गेले होते. त्यांनाही शोधून संपर्क करण्यात आला आहे. आरोग्या विभागाचे कर्मचारी या सर्वांवर लक्ष ठेऊन आहेत. हे सर्व प्रवासी बरेच दिवस सोबत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या तपासणीचं काम सुरु आहे. त्यांनी कुणाच्या भेटीगाठी घेतल्या याचीही माहिती घेतली जात आहे. ते 1 मार्चला भारतात आले आहेत. त्यानंतर ते अनेक लोकांच्या संपर्कात आले असतील. ओला चालक देखील यांना घेऊन आल्यानंतर इतर कोणत्या प्रवाशांना घेऊन आला याचीही माहिती घेतली जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातम्या:

पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

कोरोनाचा कहर, संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा रद्द

अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आयोजकांची खबरदारी

‘गो कोरोना गो’वर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया

Corona infected patient in Pune

Published On - 7:06 pm, Tue, 10 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI