रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती भवनात अर्धा तास चर्चा

लेह दौऱ्यानंतर दिल्लीला परतल्यावर पंतप्रधानांनी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन चर्चा केली (PM Narendra Modi meets President Ramnath Kovind)

रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती भवनात अर्धा तास चर्चा

नवी दिल्ली : चीनसोबत सीमेवर तणाव वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दोघांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. (PM Narendra Modi meets President Ramnath Kovind)

पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच लेह-लडाख दौऱ्यावरून परतले आहेत. सीमा भागातूनच नरेंद्र मोदी यांनी चीनला ठणकावले होते. राजधानी दिल्लीला परतल्यावर पंतप्रधानांनी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक महत्त्वपूर्ण ट्वीट केले आहे. “भारत इतिहासाच्या अत्यंत नाजूक वळणावरुन जात आहे. आपल्याला एकाच वेळी बर्‍याच अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे. परंतु आपल्यासमोर जी संकटे उभी ठाकतील, त्यांचा सामना करण्याचा आपला निर्धार पक्का असायला हवा.” असं नायडू यांनी लिहिलं आहे.

भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जुलैला लडाखला भेट दिली होती. मोदींनी लष्कर, वायुसेना आणि इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांशी संवाद साधला. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांचीही त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावतदेखील लेह दौऱ्यावर होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना थेट पंतप्रधान तिथे पोहोचल्याने भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे.

“विस्तारवादाचं युग संपलेलं आहे. हे युग विकासवादाचं आहे. वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत विकासवादच योग्य आहे. विस्तारवादाचं भूत ज्याच्या मानगुटीवर बसतं, तो नेहमीच जागतिक शांततेसाठी धोका बनला आहे.” असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.

(PM Narendra Modi meets President Ramnath Kovind)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI