पालघर हत्येच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरत होती : प्रवीण दरेकर

गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे (Pravin Darekar on Palghar Mob Lynching).

पालघर हत्येच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरत होती : प्रवीण दरेकर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 09, 2020 | 8:25 PM

पालघर : गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे (Pravin Darekar on Palghar Mob Lynching). ही घटना महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणात पोलीसच पोलिसांचा तपास निष्पक्ष करणार का यावर माझी शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून काढून सीबीआयकडे दिली जावी, असं मत दरेकर यांनी व्यक्त केलं. यावेळी प्रवीण दरेकर यांनी पालघर हत्याकांडाच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आजूबाजूला फिरतात, असाही आरोप केला.

प्रवीण दरेकर म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रथम जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. मग हल्ला चढवल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती जिल्हा मुख्यालयाला दिली होती का? ही घटना महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणात पोलीसच पोलिसांचा तपास निष्पक्ष करणार का यावर माझी शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून काढून सीबीआयकडे दिली जावी. तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.” या घटने संबंधातील अनेक मागण्यांचे निवेदन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे यांनी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि तहसीलदार सुनील शिंदे यांच्याकडे दिले.

गृहमंत्र्यांनी पालघरची घटना घडल्यानंतर 20 दिवसांनी भेट दिली. मात्र, त्यांनी या भेटीदरम्यान काय साध्य केले? या घटनेची सद्यस्थिती पोलिसांनी केलेला तपास याची माहिती देणे अपेक्षित असताना तसे केले नाही. उलटपक्षी या घटनेच्या वेळी चित्रफितीत दिसत असलेले नेतेमंडळी त्यावेळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरत होती, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

या घटनेमध्ये पोलीस प्रशासन जितके जबाबदार आहे तितकेच जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी देखील जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या कुचराईचीही चौकशी व्हायला हवी. या प्रकरणांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं असमाधानकारक आहे. यामध्ये असलेल्या या अधिकारी-कर्मचारी साखळीवरही कारवाई होणे अपेक्षित असल्याचं मतही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं.

‘पक्षवाढीसाठी तरुण उमेदवारांना वाव देण्यात काही गैर नाही’

विधान परिषदेमध्ये तिकीट वाटपावरुन ज्येष्ठांना डावलण्यात येत असल्याच्या आरोपवरही प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “पक्षामध्ये वेगवेगळ्या समाज समाजघटकांना प्रतिनिधित्व व प्राधान्य देण्याची पक्षाची भूमिका आहे. कोणालाही डावलण्याची भूमिका पक्षाची नाही. नव्या जुन्यांचा संगम साधण्याचं काम पक्षाचं आहे. पक्षवाढीसाठी तरुण उमेदवारांना वाव देण्यात काही गैर नाही. मात्र, पक्षामध्ये सर्वांकडून पक्षशिस्त पाळली जाते.”

संबंधित बातम्या : 

स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करा, केंद्राकडे जादा रेल्वे गाड्यांची मागणी करा, चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला

आधुनिक श्रावणबाळ! 80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मालाड ते वाशिम 350 किमी प्रवास

‘काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली, पण मी ठणठणीत बरा’, अफवा पसरवणाऱ्यांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

Pravin Darekar on Palghar Mob Lynching

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें