पुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात कुरकुंभ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने आगीत कोणालाही प्राण गमवावे लागले नाहीत

पुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

दौंड (पुणे) : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये ‘अल्काईन अमाईन्स’ या केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण आग (Kurkumbh MIDC Chemical Company Fire) लागली होती. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने आगीत जीवितहानी टळलेली असली, तरी कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

‘अल्काईन अमाईन्स’ कंपनीत काल (बुधवारी) रात्री दहा वाजताच्या सुमारास आग भडकली. सुरुवातीला आगीची व्याप्ती पाहता दक्षतेसाठी कुरकुंभमधील ग्रामस्थांना घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुरकुंभवासियांनी इतरत्र हलण्यास सुरुवात केली. मात्र आग आटोक्यात आल्यानंतर संभाव्य धोका टळल्यामुळे ग्रामस्थांना थांबवलं गेलं.

कुरकुंभ एमआयडीसीमध्ये अल्काईन अमाईन्स ही केमिकल निर्मिती करणारी कंपनी आहे. आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे कुरकुंभसह आजूबाजूच्या गावांमधील लोकांनीही घरं रिकामी करुन इतरत्र जाण्याची तयारी केली होती. मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपल्या घरीच थांबावं, असं आवाहन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी केलं.

या आगीत जीवितहानी झालेली नाही, मात्र आग लागण्याचं नेमकं कारण काय, याची चौकशी करणार असल्याचं तहसीलदारांनी सांगितलं. दौंडचे रासप आमदार राहुल कुल यांनीही रात्री उशिरा घटनास्थळाला भेट दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI