मच्छीमारांच्या मतदानावर बहिष्काराचा धसका, रामदास कदम दिल्लीत!

मच्छीमारांच्या मतदानावर बहिष्काराचा धसका, रामदास कदम दिल्लीत!

मुंबई : मच्छीमारांच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याचा धसका घेत शिवसेनेने थेट दिल्ली गाठली आहे.  मच्छीमारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर रामदास कदम तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह आणि रामदास कदम यांच्यात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही भेट आहे.

पर्शियन नेट मासेमारीला, एल.ई.डी लाईटद्वारे होत असलेल्या मासेमारीला महाराष्ट्रातील मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे. कोकणातील मासेमारी करणाऱ्या समुदायाने यावर बंदी न घातल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. हा मुद्दा चिघळू नये यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. त्यासाठी सोमवारी रात्री उशिरा राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली. त्यानंतर ही भेट निश्चित करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवानी एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मच्छीमारांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने जर लवकरात लवकर या अवैध मासेमारीविरोधात कारवाई केली नाही, तर मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंतचे सर्व पारंपरिक मच्छीमार हे निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा मच्छीमारांनी दिला होता.

एल.ई. डी मासेमारीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे बंदी असूनही राजरोसपणे ही मासेमारी चालत आहे. याच्याच विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पारंपरिक मच्छिमारांनी 26 जानेवारीला या मासेमारी विरोधात उपोषणही केलं होतं. एल.ई.डी. मासेमारीमूळे संपूर्ण मासळीच समुद्रातून नष्ट होण्याची चिन्हे आहेत.

एल.ई.डी. मासेमारीच्या विरोधात अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, सभा घेऊन संबधित मंत्र्यांपर्यंत निवेदनाद्वारे विषय मांडण्यात आला. तरी देखील काहीच दाद लागत नाही. राजकीय पाठिंबा असल्यामुळेच एल.ई.डी फिशिंग बिनधास्तपणे सुरु आहे, असा आरोप येथील मच्छीमारांनी केला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI