सांगलीतील स्टेडियमला तलावाचं स्वरुप, खेळाडूंऐवजी म्हशी धुणाऱ्यांची मैदानात गर्दी

मिरजेतील छत्रपती शिवाजी स्टेडियमला तलावाचे स्वरुप आले आहे. स्टेडियम इतकं भरलं आहे की स्थानिक लोक या मैदानात चक्क म्हैशी धुण्यासाठी येत आहे.

सांगलीतील स्टेडियमला तलावाचं स्वरुप, खेळाडूंऐवजी म्हशी धुणाऱ्यांची मैदानात गर्दी

सांगली : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. दुष्काळी भागातील नद्यांनाही पूर आला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. हातातोंडाशी आलेला घास अक्षरश: हिरावला आहे. एकीकडे हे चित्र असताना, तिकडे सांगलीत वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

मिरजेतील छत्रपती शिवाजी स्टेडियमला तलावाचे स्वरुप आले आहे. स्टेडियम इतकं भरलं आहे की स्थानिक लोक या मैदानात चक्क म्हैशी धुण्यासाठी येत आहे. या स्टेडियमचा वापर म्हशी धुण्यासाठी होत आहे. गुडघ्यापेक्षा जास्त पाणी भरल्याने मैदानात म्हशीच म्हशी दिसत आहेत.

शहरात जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मिरजेतील छत्रपती शिवाजी स्टेडियम तलावाचे स्वरूप आले आहे. महापालिकेने रस्त्यावरील साचलेले सर्व पाणी या क्रीडांगणात सोडल्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून या मैदानाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर काही नागरिक म्हैशी धुण्यासाठी या स्टेडियमचा वापर करत आहेत.

या क्रीडांगण दुरुस्तीसाठी 4 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र निवडणुकीपूर्वी फक्त उदघाटन करण्यात आले. पण कामास अजून सुरुवात झाली नाही. महापौर संगिता खोत आणि आनंदा देवमाने यांचा हा प्रभाग आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचा खेळाडूंचा आरोप आहे. त्यामुळे नागरिक आणि खेळाडूंमधून महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI