नवाज शरीफांच्या जावयाला अटक, नंतर सुटका, पाकिस्तानात प्रचंड गदारोळ, सरकारविरोधात विरोधकांचा आक्रोश

नवाज शरीफ यांचे जावाई मोहम्मद सफदर यांच्या अटकेनंतर सिंध प्रांत पोलीस विरुद्ध पाकिस्तानी सैन्य असा संघर्ष निर्माण झाला. (Sindh Police revolt against Pakistan army)

नवाज शरीफांच्या जावयाला अटक, नंतर सुटका, पाकिस्तानात प्रचंड गदारोळ, सरकारविरोधात विरोधकांचा आक्रोश

इस्लामाबाद : पाकिस्तानात सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून मोर्चे काढून सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय. या गोंधळलेल्या परिस्थितीत पाकिस्तान सैन्याने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई मोहम्मद सफदर यांना अटक केली. या अटकेला विरोध झाल्यानंतर त्यांची सुटकादेखील करण्यात आली (Sindh Police revolt against Pakistan army).

पोलीस आणि सैन्यात संघर्ष

मोहम्मद सफदर यांच्या अटकेनंतर सिंध प्रांत पोलीस विरुद्ध पाकिस्तानी सैन्य असा संघर्ष निर्माण झाला. मात्र, लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मोहम्मद सफदर यांना का आणि कोणत्या परिस्थितीत अटक करण्यात आली? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत (Sindh Police revolt against Pakistan army).

नवाज शरीफ यांच्या मुलीचे सैन्यावर गंभीर आरोप

याप्रकरणी नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी सैन्यावर गंभीर आरोप केले आहेत. मरियम आपल्या पतीसोबत एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. ते ज्या रुममध्ये थांबले होते त्या रुममध्ये तोडफोड करुन त्यांच्या पतीला अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मरियम यांच्या या आरोपानंतर पाकिस्तानात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अखेर सैन्यप्रमुखांना चौकशीचा आदेश द्यावा लागला.

पाकिस्तानात 11 विरोधकांची युती

इम्रान खान सरकारविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. विशेष म्हणजे 11 विरोधकांचं ‘पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट’ नावाची महायुती झाली आहे. या महायुतीचा 18 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीत मोठी सभा संपन्न झाली. या सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका करण्यात आली.

या कार्यक्रमात नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी इम्रान खान यांच्यावर प्रचंड टीका केली. इम्रान खान आपल्या अपयशाला लपलण्यासाठी पाकिस्तानी सेनेच्या मागे लपतात, असा आरोप मरियम यांनी केला. मरियम एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी इम्रान खान यांना आपल्याला अटक करुन दाखवा असं आव्हान दिलं. या कार्यक्रमानंतर मरियम आपल्या पतीसोबत एका हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी गेल्या. मात्र, रात्री पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या पतीला अटक केली.

सिंध प्रांताच्या पोलीस महासंचालकांचं अपहरण

पाकिस्तानी सैन्याच्या काही अधिकाऱ्यांनी सिंध प्रांताच्या पोलीस महासंचालक मुश्ताक महार यांचं अपहरण केलं, त्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्ती सफदर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी स्वाक्षरी करुन घेतली, असा आरोप विरोधक आणि तेथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे.

पोलीस महासंचालकांबाबत विरोधकांचे सैन्यावरील आरोप खरे असल्याचं उघड झालं आहे. कारण मुश्ताक महार अपहरणामुळे नाराज झाले असून सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्यासह 70 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी सुट्टीवर गेले आहेत.

पोलीस अधिकारी सुट्टीवर गेल्यानंतर नवाज शरीफ यांनी ट्विट करत सरकारचा निषेध केला. सरकारने पाकिस्तानी सैन्याची प्रतिमा मलिन केली, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी पोलीस महासंचालकांचं पत्राचा फोटोदेखील शेअर केला.

संबंधित बातमी :

इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या जावयाला अटक

Published On - 10:23 am, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI