पंढरपूरजवळ भीषण अपघात, मुंबईच्या सहा भाविकांचा मृत्यू

पंढरपूरजवळ भीषण अपघात, मुंबईच्या सहा भाविकांचा मृत्यू

पंढरपूर : भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर जवळ घडली आहे. पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर घाडगे वस्तीजवळ ही घटना घडली. अपघातामध्ये मृत व्यक्ती मुंबईतील घाटकोपरचे असल्याची माहिती आहे. एसटी बस आणि भाविकांच्या ईको कारची घडक होऊन ही घटना घडली.

पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर पंढरपूरपासून काही अंतरावर असलेल्या घाडगे वस्तीजवळ भरधाव वेगात आलेल्या ईको कारने एसटीला धडक दिली. या भीषण अपघातात इको कारमधील सुरेश कोकणे, सचिन कोकणे, सविता कोकणे, प्रथम  सावंत, आर्यन कोकणे, श्रद्धा सावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून एक 16 ते 17 वर्षांची मुलगी धनश्री सावंत गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सोलापूरकडे जाणाऱ्या एसटीला पंढरपूरला देवदर्शनासाठी येणाऱ्या ईको कारने जोरात धडक दिली. ईको कारचा नंबर MH 03 AZ 3116 असून हे सर्व जण घाटकोपर भटवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलीवर सोलापुरात पुढील उपचार सुरु आहेत.

मुंबईमधील घाटकोपर परिसरात राहणारे सुरेश कोकणे यांचा लक्ष्मी केटरर्स फर्म आहे. ते आपल्या कुटुंबासह अक्कलकोट येथून पंढरपूरकडे दर्शनाला जात होते. यावेळी शनिवारी दुपारी साडेचारच्या आसपास पंढरपूरजवळ हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कार थेट बसमध्ये घुसली होती. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थितांनी तातडीने मदत केली. जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी दाखल केलं.

Published On - 8:39 pm, Sat, 2 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI