एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात तिकिटात भरघोस वाढ

एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात तिकिटात भरघोस वाढ

भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल. शिवशाही (शयनयान), शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला भाडेवाढ लागू होणार नाही.

सचिन पाटील

| Edited By:

Oct 23, 2019 | 5:10 PM

मुंबई : दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचा भार (ST Bus Fare hike) सहन करावा लागणार आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही 10 टक्के भाडेवाढ केली आहे. 24 ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. ही भाडेवाढ 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत कायम राहिल. भाडेवाढ (ST Bus Fare hike) साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल. शिवशाही (शयनयान), शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला भाडेवाढ लागू होणार नाही.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात भाडेवाढ केली जाते. याच काळात खाजगी वाहनांचेही भाडे मोठ्या प्रमाणात वाढते.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड

गेली 4 वर्षे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रुपये अग्रिम देण्यात आला आहे. एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे 2500 रुपये आणि 5000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे.

आचारसंहिता अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

यासंदर्भात एसटीच्या अमळनेर (जळगांव) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी दिवाकर रावतेंना फोन करुन मागील चार वर्षाप्रमाणे यंदाही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती केली. त्या विनंतीच्या अनुषंगाने दिवाकर रावतेंनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.

केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये हा 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत असल्याचं महामंडळाने म्हटलंय. जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा थकीत महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल.

दिवाळीच्या जादा वाहतुकीसाठी एसटी सज्ज

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एसटी महामंडळातर्फे 24 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3,500 बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतुकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें