Explainer | ‘पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग’, टॅगलाईन घेवून गाड्या निघाल्या आणि… शिंदे गटाच्या नेत्याची पुढची व्यूहरचना काय?
2019 च्या निवडणुकीत अजितदादा यांनी 'बघतोच कसा निवडून येतो ते' असे म्हणत शिवतारे यांना आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत शिवतारे पराभूत झाले. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवतारे आता पुढे सरसावले आहेत.

महेश पवार, मुंबई | 13 मार्च 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झालीय. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेतली. पत्नी सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभेचे उमदेवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. अजितदादा यांच्यामागे शिंदे गट आणि भाजपची ताकद येण्याची शक्यता होती. मात्र, अजितदादा यांना शिंदे गट आणि भाजपची रसद मिळणार का अशी शंका निर्माण झालीय. याचे कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन माजी मंत्र्यांनी अजितदादा यांच्याविरोधात घेतलेली उघड भूमिका…
बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी दोन आमदार या लोकसभेत आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार राष्ट्रवादी आणि भाजपचे संख्याबळ जास्त दिसत आहे. परंतु, राजकीय गणिते पाहिल्यास अजितदादा यांचेच जास्त विरोधक बारामती लोकसभेत आहेत.
बारामती विधानसभेतून अजित पवार आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. याच पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांचा उल्लेख लांडगा असा केला. पण, आता अजित पवार सत्तेत आले आहेत. पण, गोपीचंद पडळकर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेस सोडून सत्तेत आले. इंदापूर हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ. पण, विधानसभा निवडणुकीत निकटवर्ती दत्ता भरणे यांना निवडून आणताना अजितदादा यांनी पाटील यांच्याशी बिनसले. त्यांनीही लोकसभेत अजितदादा यांचे काम करायचे असेल तर पुढील आमदारकीची ग्वाही द्या अशी स्पष्ट मागणी केलीय. त्यामुळे अजितदादा यांच्यासमोर अडचण निर्माण झालीय.
आमदार गोपीचंद पडळकर आणि हर्षवर्धन पाटील यांनी ऐनवेळी जरी नरमाईची भूमिका घेतली तरी अजितदादा यांच्यासमोर खरे आव्हान असेल ते पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे. 2019 च्या निवडणुकीत अजितदादा यांनी ‘बघतोच कसा निवडून येतो ते’ असे म्हणत शिवतारे यांना आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत शिवतारे पराभूत झाले. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवतारे आता पुढे सरसावले आहेत.
बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र रंगत असतानाच शिवतारे यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने याला वेगळे वळण मिळाले आहे. शिवतारे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाची वाट धरली आहे. आपण महायुतीच्या किंवा त्यांच्या विचारांच्या विरोधात नाही असे ते म्हणत आहेत. पण, त्याचा खरा विरोध हा अजित पवार यांना आहे.
‘ज्यांच्या जाचाला, दादागिरीला कंटाळून अनेक जण शिवसेना किंवा भाजपमध्ये गेले आहेत. तेच अजित पवार आता महायुतीत आले. त्यांना मतदान करण्यास भाजप सांगत असेल तर आम्ही कसे मतदान करायचे? अशी भूमिका शिवतारे यांनी घेतली आहे. परंतु, अचानक लोकसभेसाठी दंड थोपटण्याचे बळ त्यांच्यात आले कुठून? त्यांचा बोलवता धनी कोण? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आघाडीत बंडखोरी होणार?
कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुका काही महिन्यापूर्वी झाल्या. यातील पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरी झाली. त्याचा फटका अजितदादा यांना बसला. त्या निवडणूकीची पुनरावृत्ती बारामतीमध्ये होणार का अशी शक्यता शिवतारे यांच्यामुळे निर्माण झालीय. शिवतारे यांचे पुरंदरमध्ये वर्चस्व आहे. तर, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आणि खुद्द बारामातीमधून गोपीचंद पडळकर यांचे बळ मिळेल अशी खात्री विजय शिवतारे यांना वाटत आहे. त्यामुळे अजित पवार यांना ही निवडणूक म्हणावी अशी सोपी नसणार आहे. सुप्रिया सुळे यांना शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांची मते मिळणार आहेत. मात्र, त्याही सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
विजय शिवतारे यांनी लोकसभेसाठी आपल्या प्रचाराला सुरवात केलीय. त्यांच्या प्रचारात असलेली गाड्यांच्या ताफ्यावर ‘फिक्स खासदार 2024’ अशी टॅगलाइन लावण्यात आलीय. यातही दुसरी आणि महत्वाची टॅगलाइन आहे ती म्हणजे, ‘विजय बापूना एक मत म्हणजे पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग’. त्यामुळे ही टॅगलाईन हा अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
