धरणांच्या तालुक्यात पाण्यासाठी महिलांचा संघर्ष

धरणांच्या तालुक्यात पाण्यासाठी महिलांचा संघर्ष

शहापूर : धरणांचा तालुका म्हणजेच शहापूरमध्ये सध्या महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.  येथे गावकऱ्यांचा संपूर्ण दिवस पाणी भरण्यात जातो. शहापूर तालुक्यात चार धरणं आहेत. तरीही हा तालुका मात्र तहानलेलाच. दुसरीकडे, याच धरणातून मुंबईला पाईप लाईनने 24 तास पाणी पुरवठा होतो. मात्र, धरणवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या तालुक्यातील विहरींनी तळ गाठला असून 170 गाव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

शहापूर तालुक्यातील दापूर हे गाव अत्यंत दुर्लक्षित गाव आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही. पाण्याची सोय नाही. या गावातील महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन दरीच्या पायथ्याशी असलेल्या वैतरणा नदीत पाणी आणण्यासाठी जातात. तब्बल दोन किमी दगड-धोंडे असलेल्या धोकादायक दरीतून चढ-उताराचा नागमोडी प्रवास करत या महिलांना पाणी आणावं लागतं. यासाठी त्यांना मदत करतात त्यांच्या मुली, त्यांना देखील पाण्यासाठी या दरीतून ये-जा करावी लागते.

ज्या वयात त्यांनी खेळायला हवं त्या वयात या मुली पाण्यासाठी कसरत करताना दिसतात. या महिला आणि लहान मुली पाण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. पाणी आणताना जर कुणी या दरीत पडलं, तर त्याचा जीव वाचवणं अवघड आहे. तरीही यांना पाण्यासाठी हा धोका पत्करावा लागत आहे.

या गावातील लहान मुली सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला, आत्याकडे किंवा आजोळी जात नाहीत. तर, डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरायला जातात. या गावाची अशी परिस्थिती पाहून या गावाकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न आता गावकरी उपस्थित करत आहेत.

या गावात पाण्याची सोय तर नाहीच मात्र, रस्ते देखील व्यवस्थित नाहीत. कुणी आजारी पडलं तर डोली करुन त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवावं लागतं. या गावात आरोग्य सेवाही व्यवस्थित नाही. गावातील दवाखाना हा  दूर असल्याने अनेकदा तिथपर्यंत पोहोचण्याआधीच आजारी व्यक्तीचा मृत्यू होऊन जातो. अशी या गावाची बिकट परिस्थिती आहे.

Published On - 7:58 am, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI