सासऱ्यांच्या अंत्यविधीला जाताना सुनेची प्रसुती, धावत्या ट्रेनमध्ये बाळाचा जन्म

रामेश्वर-मंडूवाडीह एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेने धावत्या रेल्वेमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पुनमदेवी विश्वकर्मा असे या महिलेचे नाव आहे.

सासऱ्यांच्या अंत्यविधीला जाताना सुनेची प्रसुती, धावत्या ट्रेनमध्ये बाळाचा जन्म

नागपूर : रामेश्वर-मंडूवाडीह एक्सप्रेसने (rameswaram manduadih express) प्रवास करणाऱ्या एका महिलेने धावत्या रेल्वेमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. पुनमदेवी विश्वकर्मा असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे नरखेड रेल्वे स्थानकावर थांबा नसतानाही एक्सप्रेस थांबवण्यात आली आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या बाळ व बाळंतिणीची प्रकृती उत्तम आहे.

पुनमदेवी विश्वकर्मा ही तिच्या सासऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी चेन्नईहून मूळ गावी उत्तरप्रदेशात जात होती. तिच्यासोबत तिचा नवरा मनोज विश्वशर्मा ही होते. ते दोघेही ट्रेन क्रमांक 15119 या रामेश्वरम ते मंडूवाडीह एक्सप्रेसमध्ये (rameswaram manduadih express) चढले. मात्र गाडी नागपूर (nagpur) स्थानकातून सुटल्यावर तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या.

त्यानंतर तिच्या नवऱ्याने ट्रेनमध्ये डॉक्टर आहेत का याचा शोध सुरु केला. मात्र त्यांना ट्रेनमध्ये डॉक्टर  सापडला नाही. तसेच नागपूरनंतर ही एक्सप्रेस थेट मध्यप्रदेशीत इटारसीमध्ये थांबत असल्याने त्यांच्या काळजीत अधिकच भर पडली. मात्र ट्रेनमधीला कही महिला प्रवाशांनी पुढे येत तिची धावत्या एक्सप्रेसमध्येच प्रसुती केली.

पुनमदेवी यांची प्रसूती झाल्यानंतर एक्सप्रेसमधील रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबतची सूचना देण्यात आली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी आपत्कालीन वैद्यकीय मदत म्हणून ही ट्रेन नागपूरातून 86.5 किमीवर असलेल्या नरखेड स्थानकावर थांबवण्यात आली. त्यानंतर खास रुग्णवाहिकेची सोय करुन आई व बाळाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून बाळ व बाळंतिणी दोघेही सुखरुप आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI