सिनेमा हॉलमध्ये फक्त पाणीच नाही, ‘या’ गोष्टीही घेऊन जाता येतात
सिनेमा हॉलमध्ये बाहेरून पाण्याची बाटली नेण्यावर अनेक ठिकाणी बंदी असते. पण काय तुम्हाला माहीत आहे की कायदेशीरदृष्ट्या ग्राहकाला पिण्याचं पाणी घेऊन जाण्याचा हक्क आहे? फक्त पाणीच नव्हे, तर आणखी काही गोष्टी सुद्धा तुम्ही थिएटरमध्ये घेऊन जाऊ शकता. नेमकं काय काय? हे जाणून घ्या...

सिनेमागृह म्हणजे आजच्या काळातील एक मोठं मनोरंजन केंद्र. भारतभर जवळपास 10,000 पेक्षा जास्त सिनेमा हॉल्स आहेत आणि दररोज कोट्यवधी लोक या थिएटरमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेतात. पण सिनेमा बघायला जाताना अनेकदा एकच प्रश्न डोक्यात येतो की आपण आत काय घेऊन जाऊ शकतो आणि काय नाही?
पाणी नेता येते का?
सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे सिनेमा हॉलमध्ये पाण्याची बाटली नेता येते का? याचे उत्तर आहे हो. पिण्याचे पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची पाण्याची बाटली सिनेमा हॉलमध्ये घेऊन जाऊ शकता. जर कोणी तुम्हाला अडवत असेल, तर तुम्ही व्यवस्थापनाकडे याबाबत चौकशी करू शकता.
खाण्यापिण्याच्या वस्तूंवर बंधन का?
पण जेव्हा गोष्ट येते स्नॅक्स, पिझ्झा, बर्गर, पॉपकॉर्न, बिस्किट्स किंवा इतर खाद्यपदार्थ यांची, तेव्हा बहुतेक सिनेमा हॉल्स यांना परवानगी देत नाहीत. ही बंधनं गोंधळ टाळण्यासाठी आणि थिएटरमध्ये स्वच्छता राखण्यासाठी लावली जातात.
सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?
या संदर्भात जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर टिप्पणी करताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की, सिनेमा हॉल हे खाजगी मालकीचं स्थळ आहे आणि तेथे नियम ठरवण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे. म्हणूनच, सिनेमा हॉल व्यवस्थापन तुम्हाला अन्नपदार्थ आत नेण्यास प्रतिबंध करू शकतं. पण काही अपवादात्मक परिस्थिती आहेत जिथे लवचिकता दिली जाते.
सुप्रीम कोर्टाने असंही नमूद केलं की, जर एखाद्या प्रेक्षकासोबत नवजात बाळ, वृद्ध व्यक्ती किंवा आजारी रुग्ण असेल, तर त्यांच्या गरजेनुसार खाण्याचे काही पदार्थ आत नेता येऊ शकतात. पण यासाठीही सिनेमा हॉल मॅनेजरची परवानगी घ्यावी लागते.
जर तुम्हाला इंटरवलमध्ये काही खाण्याची इच्छा असेल, तर तुम्ही सिनेमा हॉलमध्ये उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांमधून काहीही विकत घेऊ शकता. पण कोणत्याही प्रेक्षकावर ते विकत घेण्याची जबरदस्ती करता येत नाही. ग्राहकांचा हा अधिकार न्यायालयाने स्पष्ट केला आहे.
थोडक्यात काय?
1. पाण्याची बाटली स्वतःची घेऊन जाता येते.
2. स्नॅक्स किंवा इतर खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येत नाही.
3. विशेष गरज असलेल्या प्रेक्षकांसाठी सवलत शक्य आहे.
4. सिनेमा हॉलमध्ये विक्रीस असलेली वस्तू घेणं वैकल्पिक आहे, बंधनकारक नाही.
सिनेमा बघणं हा एक आनंददायी अनुभव आहे, पण त्यासाठी काही नियमांचं पालन करणं आपल्याला आवश्यक असतं. स्वतःचा हक्क जाणून घेणं आणि इतर प्रेक्षकांचा सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सिनेमा हॉलमध्ये जाताना ही माहिती लक्षात ठेवा आणि अडचण आल्यास अधिकारपूर्वक प्रश्न विचारायला अजिबात संकोच करू नका.
