दारूचा एक पेग झाला की एक ग्लास पाणी, मद्यपानाचा हा नियम माहिती आहे का? एकदा वाचाच!
Alcohol Drinking Rule : आम्ही तुम्हाला दारू पिण्याचा एक महत्त्वाचा नियम सांगणार आहोत. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते, 'प्रत्येक पेगनंतर एक ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.' या मागील कारण जाणून घेऊयात.

मद्यपान करणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. मात्र तरीही भारतासह जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक लोक दररोज मद्यपान करतात, तर काही लोक महिन्यातून एकदा दारू पितात. मद्यप्रेमींसाठी हा नेहमी वादाचा विषय राहिला आहे की, दारूमध्ये किती पाणी टाकले पाहिजे? काही लोक दारूमध्ये कोल्ड्रिंक किंवा सोडाही टाकतात. मात्र आज आम्ही तुम्हाला दारू पिण्याचा एक महत्त्वाचा नियम सांगणार आहोत. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते, ‘प्रत्येक पेगनंतर एक ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.’ यामागे नेमकं काय कारण आहे ते सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दारूच्या पेगनंतर एक ग्लास पाणी का प्यावे?
दारूच्या एका पेगनंतर एक ग्लास पाणी पिण्याबद्दल बोलताना वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांनी म्हटले की, ‘अल्कोहोल हे असे पेय आहे जे शरीरात प्रवेश करताच रक्तात विरघळण्यास सुरूवात होते. त्यामुळे लोकांना नशा येते. त्याचबरोबर अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर ते शरीराला डिहाइड्रेट करण्यास सुरुवात करते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपले शरीर ADH किंवा अँटी-ड्युरेटिक हार्मोन तयार करते जे मूत्रपिंडांना पाणी टिकवून ठेवण्यास आणि कमी मूत्र निर्माण करण्यास सांगते. मात्र जेव्हा आपण दारूचे सेवन करतो तेव्हा अल्कोहोल या हार्मोनला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मूत्रपिंड उलटे काम करते. ते शरीरातून जास्त पाणी बाहेर टाकते. त्यामुळे दारू पिल्यानंतर वारंवार लघवी करावी लागते. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. सोनल हॉलंड यांच्या मते प्रत्येक पेगनंतर एक ग्लास पाणी पिल्यास शरीरात पाण्याची कमतरता जाणव नाही. यामुळे शरीर डिहायड्रेट होत नाही.
दारू पिताना पाणी न पिल्यास काय होते?
मद्यपान करताना पाणी न पिल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी स्पष्टपणे दिसून येतो. ज्याला आपण हँगओव्हर म्हणतो. यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोकेदुखी, तहान लागणे आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दारू पिताना पाणी पिणे महत्त्वाचे आहे. तसेच सोनल हॉलंड यांनी असेही म्हटले आहे की, अल्कोहोल पिण्यापूर्वी काहीतरी खाणे महत्वाचे आहे. ते शक्य नसेल तर दारू पिताना काही हलके फुलके पदार्थ खावेत. यामुळे पोटावर अल्कोहोलचा थेट परिणाम होत नाही. यामुळे शरीर कमी प्रमाणात अल्कोहोल शोषते. ज्यामुळे अल्कोहोलचे परिणाम कमी जाणवतात.
