संभाजीराजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करा; 14 खासदारांचा पाठिंबा

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून त्यांना मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्याची गळ घालणाऱ्या १४ खासदार आणि दोन आजी-माजी आमदारांची यादी जाहीर केली आहे.

संभाजीराजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करा; 14 खासदारांचा पाठिंबा

सातारा:  भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करावं म्हणून त्यांना सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत विविध पक्षाच्या 14 खासदार आणि दोन आजी-माजी आमदारांनी संभाजीराजे यांना आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करण्याची गळ घातली आहे. यात भाजपच्याच नव्हे तर शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा संभाजीराजे यांना मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करण्यासाठी सर्वाधिक पाठिंबा मिळताना दिसतो आहे. (14 mp support to chhatrapati sambhaji raje for maratha reservation)

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून त्यांना मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्याची गळ घालणाऱ्या 14  खासदार आणि दोन आजी-माजी आमदारांची यादी जाहीर केली आहे. यात शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश आहे. खासदार श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा, शिवसेनेचे दादरचे खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, हिना गावित, रक्षा खडसे, प्रितम मुंडे, डॉ. सुजय विखे-पाटील आणि उन्मेष पाटील आदींनी पत्र लिहून आणि प्रत्यक्ष भेटून संभाजीराजे यांना मराठा आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. तर, अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी आमदार निर्मला गावित यांनीही संभाजी राजेंना नेतृत्त्व करण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

संभाजीराजे यांनी या खासदारांनी पाठिंबा दिल्याबद्दल ट्विटरवरून आभार मानले आहेत. “मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकावे यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन मी समाजाच्या वतीने केले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून पाठिंबा दिलेल्या सर्व खासदारांचे समाजाच्या वतीने समाजाचा घटक या नात्याने आभार व्यक्त करतो,” अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

 

(14 mp support to chhatrapati sambhaji raje for maratha reservation)

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर सर्वात आधी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करण्याची विनंती केली होती. “महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या लढ्यात सुरुवातीपासून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते,” असं शेवाळे यांनी म्हटलं होतं. तर, दुसरीकडे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उदयनराजे भोसले यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, असं आवाहन केलं होतं. मात्र, मेटे वगळता कोणत्याही बड्या नेत्याने मराठा आंदोलनाच्या नेतृत्त्वासाठी उदयनराजे भोसले यांना पाठिंबा दर्शविलेला नाही. विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा आंदोलनाच्या नेतृत्त्वाबाबत छत्रपतींच्या घराण्यात कुणीही वाद लावू नये, असं सांगतानाच दोन्ही राजेंनी या आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं, शिवसेना खासदाराची मागणी

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

14 mp support to chhatrapati sambhaji raje for maratha reservation

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *