आम्ही काय बुळे नाहीत… धनंजय मुंडें यांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्ला काय?
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप होत आहे, या प्रकरणात जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप होत आहे, या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, तसेच जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल देखील केला आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल. पण इथली पोलीस यंत्रणा कोणत्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहे. म्हणूनच कर्ते करवते तेच आहेत. सर्वांचेच टार्गेट धनंजय मुंडे का? एवढ्या जणांना मी आवरला जात नाही का? कमाल आहे, त्या दिवशीच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला त्याचा राग आला की मी चष्मा पाठवला नाही याचा राग त्यांना आला? असा टोलाही यावेळी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्यापासून सगळ्या पृथ्वीलाच धोका आहे असं समजा. मी काय कोव्हिड व्हायरस झालो काय आता? संवैधानिक पदावरील मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत ऑन एअर कुणाचीही आयमाय काढतात. सरकार काही करत नाही. पण आम्ही काय एवढे बुळे नाहीत, या सर्व गोष्टी न समजायला. असा हल्लाबोल यावेळी धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
दादागिरी सुरू आहे. अंतरवलीतूनच अंतर पडत चाललं आहे. तुमच्या मेव्हण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले? मी सरकारला विचारणार आहे. त्यात काय कारवाई झाली? सामान्य माणसाला एमपीडीएमध्ये घालतात, यांची यादी देऊन काय कारवाई झाली? असा सवालही यावेळी मुंडे यांनी उपस्थिती केला आहे.
