
Shivsena Bjp Clash : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक स्थानिक नेते, माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळेच आता शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे. त्याचे परिणाम आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले. शिंदेंच्या मंत्र्यांनी या बैठकीवर थेट बहिष्कार घातला. दरम्यान, आता आमच्यात कोणतीही नाराजी नसल्याचे शिंदे यांच्या पक्षाकडून सांगण्यात आहे. तसेच महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचेही भाजपान सांगितले आहे. असे असतानाच महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कथित नाराजीनाट्यावर भाष्य केले आहे. अगोदर त्यांनी फक्त एक वाक्य बोलून या विषयावर बोलणे टाळले होते. परंतु नंतर माध्यमांपुढे येत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
महायुतीतील नाराजीनाट्यानंतर अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या बहिष्काराबद्दल विचारताच अजित पवार यांनी ‘नाही रे बाबा असं काही नाही. हे मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे,’ अशा एका वाक्यात उत्तर दिले होते. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत सविस्तरपणे माहिती दिली. मला काही माहीत नाही. मला ते जाणवलंही नाही. आमचेही बरेच मंत्री नव्हते. मुश्रीफही निघून गेले होते. आज अर्जांची छाननी आहे, असं मला वाटलं. त्या छाननीमुळे संख्या कमी झाली की काय असं वाटत होतं. नंतर मी निघून आलो. त्यानंतर काही पत्रकार मित्रांनीच विचारलं. पण मला बैठकीदरम्यान ही नाराजी जाणवली नाही. तसं काही जाणवलं असतं तर मी एकनाथ शिंदे यांनाच विचारलं असतं, असे सांगत महायुतीत कोणतीही नाराजी नाही, असे अजितदादांनी सांगितले.
पुढे बोलताना प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. निवडणुकीत हे प्रमाण वाढतं. तिकीट देण्याच्या निमित्ताने पक्षबदलामध्ये वाढ होते. अध्यक्षपदाची उमेदवारी देतानाही असं घडतं, असेही मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांनी निधीवाटपावरील नाराजीवरून बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे अगोदर सांगितले जात होते. परंतु नंतर भाजपाच्या इन्कमिंगवरून ही नाराजी असल्याचे समोर आले. एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाचे नेते शिवसेनेत घेण्यास तुम्हीच उल्हासनगरपासून सुरुवात केली, असे फडणवीस म्हणाल्याचे बोलले जात आहे. सोबतच यापुढे एकमेकांच्या पक्षात एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश द्यायचा नाही, अशीही भूमिका फडणवीसांना माडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.