स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Amit Shah in Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेशी आपल्या भाषणात अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेशी आपल्या भाषणात अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्र भाजपसाठी आजचा दिवस शुभ आहे. हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आपल्या भाषणात बोलताना अमित शहा म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो. सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे. महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरूवात करतोय. पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहिती आहे ती कार्यालय हे आपले मंदिर आहे. पक्षाचे सिद्धांत संरक्षित व संवर्धन हे कार्यालयात होतात.
या कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते, बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल, मात्र भाजपसाठी कार्यालय म्हणजे मंदिर होय. आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे निती घडवली. भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केलाय हे तिन्ही उद्देश ज्या ठिकाणी पूर्ती होते, ते ठिकाण आहे भाजपचे कार्यालय. मी सर्व माजी अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता चालत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हा एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसतेय.
इमारत पाहून मी मला आनंद झाला, 55 हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्ष सोबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे, महाराष्ट्र भाजप प्रदेशने आपल्या परंपरेला लक्षात ठेवले आहे. जनसंघानंतर भाजपचा निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते, कमळ खिलेगा, तेव्हा आपण पाहिले अटलजी पंतप्रधान झाले. त्यानंतर ११ वर्षे मोदी जी पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे नेता झाले हे आपल्या साठी गौरवाची बाब आहे.
ज्या नेत्यांनी कठीण परिस्थितीत पक्ष मजबूत केला, पक्षाचे विचारांचे बीज लावून त्याचे वटवृक्ष केले. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मी मन:पूर्वक प्रणाम करतो. मला ही अध्यक्ष होता आले. माध्यमांना सांगतो की भारतात एकमेव भाजप हा पक्ष आहे, जिथे बुथ प्रमुख हा पक्षाचा देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाही नुसार चालत नाही. ज्यामध्ये क्षमता आहे तोच याठिकाणी मोठा नेता होता. आम्ही हे सिद्ध केले की घराणेशाही या देशात चालणार नाही. तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागेल.
एका गरीब चहावाल्याचा मुलगा तीनवेळा पंतप्रधान होतो. लोकतांत्रिक पार्टीत आमचा विश्वास किती दृढ आहे, हे त्याचे उदाहरण आहे. ज्यांच्या पक्षात लोकतांत्रिक पद्धतीने निवड नाही, तिथे लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही. डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भाजपचे कार्यालय हवे, अशी विनंती मी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांना करतोय. देश सुद्धा 100 टक्के पक्ष कार्यालयाच्या दिशेने घौडदौड करत आहे.
देवेंद्र फडणवीसांनी २०१४च्या निवडणुकीची आठवण करून दिली.आम्ही युतीचा प्रयत्न केला. स्वतंत्र लढलो, महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर तीनवेळा आम्हाला बहुमत मिळाले. डबल इंजिन सरकार नको आहे. ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे.
आम्ही 2014 साली चौथ्या क्रमांकावर होतो, मात्र आता भाजप राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून विकासकामे केली. लोकांना मोफत गॅस दिला, पाणी दिले, आरोग्य विमा दिला. आम्ही सत्तेत आल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूती दिली. देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती आता ती चौथ्या क्रमांकावर आली आहे. आम्ही सत्त्तेत आल्यापासून देशावर दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना आणि ते घडवणाऱ्यांना शिक्षा देण्याचे काम केले आहे. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारण्यात आले होते. याला चोख उत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच ऑपरेशन महादेव राबवून हल्ला करणाऱ्यांना कंठस्नान घालण्यात आले.
