सर्वात मोठी बातमी ! शिंदेसेनेला गुड न्यूज, पहिलं खातं उघडणार? अमरावतीतून सरनाईक आघाडीवर
राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत शिंदेसेनेसाठी दिलासादायक बातमी आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे किरण सरनाईक आघाडीवर असल्याने महायुतीचे पहिले खाते उघडण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे पिछाडीवर असून, या निकालामुळे शिंदेसेनेला मोठा आत्मविश्वास मिळेल अशी अपेक्षा आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे. पाच जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात असलं तरी या निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गटासाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी येऊन धडकली आहे. या निवडणुकीत शिंदे गट सर्वात आधी खातं खोलणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदार संघाचे शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. महायुतीसाठी हे शुभसंकेत मानले जात आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या काँग्रेसच्या अदिती पोहरे पिछाडीवर आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार सरनाईक किती मतांनी निवडून येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
गावडेंना विश्वास
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आमचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. महायुतीतील दोन उमेदवार रिंगणात असले तरी याचा काहीही फरक पडणार नाही. शिक्षकांचा आम्हाला पाठिंबा आहे. मतदानावर काही आक्षेप असले तरी निवडणूक अधिकारी चांगल्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडतील, असा विश्वास कौस्तुक गावडे यांनी व्यक्त केला आहे.
दुपारी २ नंतर निकाल
दरम्यान, नागपूर पदवीधर निवडणुकीची मतमोजणी ८ वाजतापासून सुरू झाली आहे. दुपारी ३ नंतर नागपूरचा पहिला निकाल येणार आहे. नागपूर विभागीय क्रीडा संकुलात ८४ टेबलवर ही मतमोजणी होत आहे. ३८ उमेदवारांच्या ३८ पेट्या आणि एक अशा ३९ मतपेट्यातील मतांची मोजणी होणार आहे. दुपारपर्यंत मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करुन मतमोजणी सुरु होईल. सायंकाळी ४-५ पर्यंत ८४ हजार मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर उर्वरित मतांची मोजणी केली जाईल, रात्री ८ पर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल.
अशी आहे मोजणी
एकदा वैध मते निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवारासाठीचा विजयाचा कोटा निश्चित केला जाईल. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जर एखादा उमेदवार त्या कोट्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याला विजयी घोषित केले जाईल. अन्यथा दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतर पुढच्या पसंतीच्या मतांची मोजणी करून कोणता उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत आधी पोहोचतो हे पाहिले जाणार आहे. जोपर्यंत एखादा उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचत नाही, तोवर पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू राहील, असं सूत्रांनी सांगितलं.
