जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते निवृत्ती, मुंडे बहीण-भावांच्या विधानांनी चर्चांना उधाण; भात्यातून पुन्हा काढला नाराजीचा बाण
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विधानांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नापासून निवृत्तीच्या विचारांपर्यंत, पंकजाताईंची राजकीय खदखद समोर आली. तर धनंजय मुंडे यांनी घटलेल्या वजनाची चिंता व्यक्त करत पुन्हा उभारी घेण्याचे संकेत दिले. बीडमधील या राजकीय घडामोडींचे पडसाद राज्यभर उमटत आहेत, ज्यामुळे मुंडे कुटुंबातील वाढत्या नाराजीची चर्चा सुरू आहे.

आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, असं म्हणत पंकजाताईंनी नाराजीचा सूर आळवला तर सत्तेचा सोपान कठीण झाल्याची जाणीव धनु भाऊंना अस्वस्थ करुन गेली. त्यातून हताशा बाहेर पडत आहे. बीडच्या राजकारणाचे पडसाद राज्यात उमटत आहे. बीड जिल्ह्यात दगड जरी पडला तरी त्याचे तरंग राज्यातील राजकीय पटलावर पडतात. कधी काळी लातूर आणि नांदेड सत्ताकेंद्र होते. ते मुंडे भावा बहिणीने महत प्रयासाने गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर बीडमध्ये हलवले होते. पण या सत्ता केंद्राला सुरूंग लागला. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे विधान पंकजाताईंनी भाजपची सत्ता राज्यात आल्यावर केलं आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. खासदारकीचा पराभव मनाला लागला. त्यानंतर बॅकडोअर मार्गे विधान परिषदेवर त्यांचं पुनर्वसन झालं. पण आता त्यांना निवृत्तीचे वेध लागले. तर वजन कमी झालंय पण चमत्कार दाखवायला फिट होतोय, असे धनंजय मुंडे म्हणाले. मुंडे बहीण-भावांच्या विधानांनी चर्चांना उधाण आले आहे. भात्यातून दोघांनी पुन्हा नाराजीचा बाण बाहेर काढल्याचे मानलं जातं आहे.
बीड जिल्ह्यातील परळी आणि शिरसाळा येथे आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. कार्यक्रमातील मंचावरून त्यांनी केलेली विधान आणि वक्तव्य यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांची राजकीय खदखद हा सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली विधान ही केवळ भावनिक नाही, त्याचे राजकीय अर्थ अत्यंत खोल आहेत. आपली मुस्काटदाबी होत असल्याचे संकेत ते या विधानातून देत तर नाहीत ना? अशी शंका कार्यकर्त्यांना येत आहे. यामुळे बीड आणि परळी भागातील राजकारण तापलेले आहे. गेल्या काही वर्षातील मुंडे भावाबहिणींचे राजकीय खच्चीकरण सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आम्ही भाऊ-बहीण मंत्री झालो पण आमच्यापैकी एकाला घरी बसावे लागले, अशी खंत पंकजाताई मुंडे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. तर धनंजय मुंडे यांनी आपले राजकीय वजन कमी होत असल्याची खंत जाहीरपणे व्यक्त केली. त्याचवेळी आता पुन्हा नव्याने उभारी घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. येणारा काळ आपलाच आहे, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील राजकारणातील अंडर करंट यानिमित्ताने प्रकर्षाने राजकीय पटलावर पुढे आलेले आहेत
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते आता निवृत्ती
मी मुख्यमंत्री होईल की नाही माहित नाही. तसेच पुढील काळात मी मंत्रिपदी असेन की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. पण जनतेच्या मनात माझ्या मुख्यमंत्रीपदाचे गणित मात्र पक्के झाले आहे, असे वक्तव्य पंकजाताई मुंडे यांनी भारतीय विद्यापीठाच्या कार्यक्रमांमध्ये 11 मे 2015 रोजी केले होते. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांनी भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंकजाताई मुंडे या राज्याच्या महिला मुख्यमंत्री होतील, असे विधान केले होते. त्यानंतर पंकजाताईंनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावा केला होता. मी जिथे जाते तिथे मुंडे साहेबांची आठवण निघते. मुंडे साहेब प्रत्यक्षात मुख्यमंत्री नसले तरी ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होते, याची साक्ष मिळते. मी पण मुख्यमंत्री होईल की नाही हे माहिती नाही, मात्र मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असेल. त्याचे गणित पक्के आहे, असे वक्तव्य त्यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले होते. त्याचे राजकीय परिणाम आणि राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली.
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याचे सांगत भाजपमधील अनेक नेत्यांनी या विधानाबद्दल त्यांच्यावर टीका सुद्धा केली होती. त्यानंतर पंकजाताई मुंडे विधानसभेला सामोरे गेल्या. तोपर्यंत कुटुंबातच मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. धनंजय मुंडे हे पंकजाताईंच्या विरोधात विधानसभेमध्ये उभे ठाकले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंचा मोठा पराभव केला होता. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना एक लाख 22,114 इतके मतदान झाले, तर पंकजाताईंना 91413 इतके मते मिळाली होती. पंकजाताईंचा पराभव झाला होता. यामध्ये धनंजय मुंडे यांचे संघटनात्मक कौशल्य समोर आले होते. तर मुंडे घराण्यात आता पुढील वारसा धनंजय मुंडे चालवतील, असे एक प्रकारे अधोरेखित झाले होते.
त्यानंतर राज्यात अचानक एक वेगळा राजकीय प्रयोग झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पुढाकाराने नवीन सरकार सत्तेत आले. भाजप आणि शिवसेना या नैसर्गिक महायुतीला हा जबरी धक्का होता. त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल, अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर 2022 मध्येच पुन्हा राजकीय पटलावर मोठी धुमशान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आले. पुढे राष्ट्रवादीत फूट पडून अजित दादा सुद्धा सरकारमध्ये सहभागी झाले आणि बीड जिल्ह्यातील राजकारणाला नवीन दिशा वळण मिळाले. आतापर्यंत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले भाऊ-बहीण सत्तेत एकत्र आले आणि बीडच्या राजकारणाची दिशा बदलली.
पंकजाताईंना दुसरा जबर धक्का
बीड लोकसभा मतदारसंघात 2024 मध्ये मोठा फेरबदल झाला. भावा बहिणीतील संघर्ष मावळला. दोन वेळ खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत भाजपने पंकजा मुंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. चेहरा बदलल्यामुळे मतदारसंघातील समीकरणं भाजपसाठी अनुकूल होतील, असा अंदाज होता. पण सुप्त नाराजी, संघटनात्मक बांधणी ढेपाळल्याने पंकजाताईंना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 पासून बीड हा भाजपचा अभेद्य किल्ला होता. त्याला बजरंग सोनवणे यांनी सुरुंग लावला. पंकजा मुंडे यांच्या मदतीला आमदार आणि खासदारांची फौज होती. पाच विधानसभा आमदार, एक लोकसभा खासदार, एक राज्यसभा खासदार, एक विधानपरिषद आमदार, अशी स्टार कास्ट असतानाही त्यांचा पराभव झाला. बीडमधील मते मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनामुळे फिरल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला. ही बोचणी अनेकांच्या मनाला लागली. पण चार महिन्यांतच पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेतले. त्यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्रीपद दिले. पण पंकजाताईंचे मन या खात्यात रमत नसल्याचे कालच्या त्यांच्या विधानावरून समोर येत आहे.
धनंजय मुंडेंना मिळालेल्या जुन्या समाजकल्याण खात्याचा आणि स्वतःला मिळालेल्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्रालयाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, आम्हा दोघांनाही अशी खाती मिळाली, ज्यांना बोलता येत नाही. लोकांना पर्यावरण मंत्रालय समजावून सांगताना माझ्या नाकी नऊ येतात. बीड-परळी हायवे आणि स्थानिक विकासकामांच्या प्रलंबित प्रश्नांवर बोलताना त्या म्हणाल्या, मी वयाच्या 24 व्या वर्षापासून राजकारणात संघर्ष करत आहे. आता 48 व्या वर्षी मला या राजकारणाचा अक्षरशः कंटाळा आला असून कधीकधी रिटायर्ड व्हावंसं वाटतं, असे विधान त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, संविधानाने समानतेचा अधिकार दिला असला, तरी आजही राजकारणात स्त्री-पुरुष भेदाचे राजकारण केले जाते आणि त्याचा सर्वाधिक त्रास मला सहन करावा लागतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंडे बहीण भावाच्या विधानांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देशमुख हत्या प्रकरणाने राजकारणाला कलाटणी
मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने राज्यच नाही तर देश सुद्धा हादरला. 9 डिसेंबर 2024 रोजी त्यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली. गावातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणीला विरोध केल्याने त्यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर सगळ्यांच्याच मनाचा थरका उडाला. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. यामागे राजकीय वरदहस्त असल्याचे सुरुवातीला बोलले जात होते. प्रकरणात मकोका लागलाय. त्यानंतर याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड हा आरोपी असल्याचे समोर आले. या गुन्ह्यातील इतरही आरोपींना अटक करण्यात आली. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेनंतर बीडचे राजकारण पार पालटून गेले. बीडमध्ये राजकीय वादासोबतच जातीय तणाव वाढल्याच दावा करण्यात आला. या घडामोडीनंतर काही महिन्यांनी प्रकृतीचे कारण समोर करत आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
भाजपची फारकत घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रयत्नाने राष्ट्रवादीचे बळकटीकरण आणि संघटनात्मक बांधणी परळी आणि बीड जिल्ह्यात केली होती. त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रयोगही यादरम्यान केले होते. त्यांनी मोठ्या मेहनतीने पक्ष उभारणीचे काम केले होते. पक्षफुटी नंतर धनंजय मुंडे हे अजित दादांसोबत सत्तेत सहभागी झाले होते. पण 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळाजवळ अजित दादांचे अपघाती निधन झाले आणि धनंजय मुंडे यांचा एक भक्कम पाठीराखा, हितचिंतक काळाच्या पडद्याआड गेला. मंत्रिपद नाही, नेताही नाही, त्यात स्थानिक पातळीवर सुरू असलेला राजकीय आणि सामाजिक रेटा यामुळे गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे हे सातत्याने अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते. त्यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा भर सभेत कार्यक्रमातून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता
नकारात्मक राजकारणाचा फटका
बीडमधील कोणत्याही घटनेची, वादाची किंवा गुन्हेगारी प्रकरणाची विनाकारण आपल्यावर टीका होते, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तर राजकीय भावना व्यक्त केल्याने पंकजा मुंडे यांना राजकीय किंमत चुकवावी लागली आहे.
राजकीय संकटांची मालिका
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण-भावांना गेल्या काही वर्षांत पक्षात आणि निवडणुकीत विविध राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला. पंकजाताईंना विधानसभा आणि लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागला. तर मजबूत संघटन असतानाही धनंजय मुंडे यांना पदाने हुलकावणी दिली आहे. तर जी खाती दिली आहेत. त्यावरून पंकजा मुंडे नाराज आहेत.
जातीय आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असा राजकीय वाद प्रकर्षाने जाणवतो. काही प्रकरणात जातीय कार्ड खेळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप झाले आहेत. महिला आणि कार्यकर्त्यांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आहे. काही कार्यकर्त्यांच्या खूनाच्या घटनांनी जिल्हा ढवळून निघाला आहे.
विकास कामे न झाल्याने नाराजी
परळी ते अंबाजोगाई हा 24 किलोमीटरचा रस्ता असो वा परळी शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा असो. नागरी समस्यांविरोधात नागरिकांची मोठी नाराजी आहे. ही साधी सोपी कामं लवकर मार्गी लागत नसल्याने लोकप्रतिनिधींवर त्यांची नाराजी आहे. तर सरकार दरबारी वजन खर्चून कामं मार्गी लावण्याची जनतेची मागणी आहे.
