बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत येणार का ? भुजबळ पक्ष सोडणार का ? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले
NCP Leader Ajit Pawar and baba siddique | मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेसमधील बडा नेते बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्याबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

धुळे, दि.3 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्रात काँग्रेसला नुकताच मोठा झटका बसला होता. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी 55 वर्षांपासून काँग्रेसशी असलेले नाते संपुष्टात आणले होते. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या काही दिवसानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली. वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार
बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, कुणीही काहीही वक्तव्य करण्याला काहीही महत्त्व नाही. बाबा सिद्दीकी यांच्या बाबतीत अफवा आहे. तसेच छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांवर स्वत: भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भुजबळ यांनी स्वतः भाजप प्रवेश नकाराला आहे. यामुळे बोलणाऱ्यांनी जबाबदारीने बोलले पाहीजे, असा टोला त्यांनी अंजली दमानिया यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
भाजप आमदाराकडून गोळीबारावर…
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख शरद गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सर्वांकडून कायद्याचे पालन होणे अपेक्षित आहेत. कुणीही कायदा हातात घेण्याचे काम करू नये. सर्वाना नियम कायदे सारखे आहेत. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीशी बोलणार आहे. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी टोकाची भूमिका का घेतली याची माहिती घेणार आहे.
माढा आमदार रणजित राजे निंबाळकर
माढा आमदार रणजित राजे निंबाळकर यांच्याबाबत प्रश्नावर अजित पवार संतापले. चांद्यापासून ते बांधापर्यंत सर्व प्रश्नाचे उत्तर द्यायचे का ? कुठे काय चालले आहेत त्याला मी काय उत्तर द्यायचे ? भाजपचा पक्षांतर्गत विषय असून ते त्यांचा प्रश्न ते सोडवतील.
हे ही वाचा
काँग्रेसला आणखी एक धक्का, दिग्गज नेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर
