बॉल आणायला गेला, झाडाला आंबे पाहून तोंडाला पाणी सुटलं, तोडून घरी आणताना…; बदलापुरात 15 वर्षीय मुलासोबत काय घडलं?

| Updated on: May 05, 2026 | 9:35 AM

बदलापूरच्या आपटेवाडीत झाडाचे आंबे तोडल्याच्या कारणावरून एका १५ वर्षीय मुलाला दाम्पत्याने अमानुष मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता केवळ झाडाचे आंबे तोडले या कारणावरून १५ वर्षीय मुलाला एका दाम्पत्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरच्या आपटेवाडी परिसरातील स्वानंद तरंग सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा एक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात संबंधित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी दुपारी स्वानंद तरंग सोसायटीत काही लहान मुले क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता या मुलांचा बॉल बाजूला असलेल्या एका बंगल्याच्या आवारात गेला. पीडित मुलगा तो बॉल आणण्यासाठी बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये गेला. त्यावेळी त्याला तिथे आंब्याचे झाड दिसले. त्याने या झाडाचे काही आंबे काढण्यास सुरुवात केली. त्याने काही आंबे तोडले.

ही बाब बंगल्याचे मालक राजा जामदरे यांना समजली. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने रात्रीच्या वेळी सोसायटीत येऊन गोंधळ घातला. त्यांनी संबंधित मुलाला गाठून त्याला आंबे का तोडले, याबद्दलचा जाब विचारला. तसेच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. जामदरे दाम्पत्य इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी त्या मुलाला मारत मारत त्याच्या घरापर्यंत नेले. तसेच त्याच्या पालकांसमोरच त्याला लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली.

सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

यानंतर पुन्हा कधी जर तुझ्या मुलाने आंबे तोडले, तर त्याला नग्न करून मारू, आम्ही इथले गाववाले आहोत, असे धमकी पीडित मुलाच्या आईलाही देण्यात आली. सोसायटीच्या आवारात घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुलाला झालेल्या जखमा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी राजा जामदरे आणि त्यांच्या पत्नीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नसली तरी एका अल्पवयीन मुलाला अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे बदलापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केवळ काही आंब्यांसाठी एका अल्पवयीन मुलाला अशा प्रकारे अमानुषपणे मारहाण करणे आणि त्याच्या पालकांना धमकावणे, हे समाजातील वाढत्या हिंसक मानसिकतेचे लक्षण असल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात आरोपी दाम्पत्यावर कठोर कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

Published on: May 05, 2026 9:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us