बिरोबाची खोटी शपथ घेतो…, बापू बिरु वाटेगावकर यांच्या मुलाचा संताप, पडळकरांबद्दल सगळंच सांगितलं
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, यावरून शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचा अपमान केला, यानंतर आता राज्यभरात पडळकरांविरोधात वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यभरात पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत, विरोधकांसोबतच या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यानं देखील नाराजी व्यक्त करत गोपीचंद पडळकर यांना सुनावलं आहे.
दरम्यान पडळकर यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्याचे पहायला मिळत आहेत. बापू बिरु वाटेगावकरांचे पुत्र शिवाजी वाटेगावकर यांनी गोपिचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांना समाजामध्ये काडीचीही किंमत नाही, जो आमचं कुलदैवत बिरोबाच्या देवळात जाऊन बिरोबाची खोटी शपथ खातो, की मी जरी उभा राहिलो तरी भाजपला मतदान करू नका, त्यामुळे त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाबद्दल आणि कुठल्या पातळीवर बोलत आहोत. जयंत पाटील म्हणजे तुम्हाला काय आतलू -फालतू माणूस वाटले का? नाही त्या मणसाच्या नादाला लागू नका, तुम्ही आता कधी या वाळवा तालुक्यात येण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आम्ही कपडे काढून वापस पाठवणार असा इशारा यावेळी शिवाजी वाटेगावकर यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून समज
दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वक्तव्याप्रकरणात गोपीचंद पडळकर यांना समज दिली आहे, याबाबत स्वत: पडळकर यांनी माहिती दिली आहे, मुख्यमंत्र्यांनी मला काही सूचना केल्या आहेत, त्या सूचनांचं मी आता पालन करणार आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन
दरम्यान पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे, गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पडळकर यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे.
