…तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले
लक्ष्मण हक्के यांनी संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मराठा नेत्यांनी या प्रकरणी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले पण ओबीसी समाजावर झालेल्या अत्याचाराबाबत दुर्लक्ष करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांची हया करताना, त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानतंर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. आता याबद्दल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली.
लक्ष्मण हाके यांनी नुकतंच पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. यावेळी त्यांनी जालना, बारामती, लातूर येथील ओबीसी तरुणांवर झालेल्या हल्ल्यात मराठा नेते सुरेश धस अंजली दमानिया आता आवाज उठवणार का, असा सवालही विचारला.
सगळ्यांना सारखा न्याय देणार का?
“संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना फाशीपेक्षा कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला जात, धर्म, पंथ कधीही असू शकत नाही. तुम्ही एखाद्या जाती समूहाला गुन्हेगार समजू नका अशी माझी भूमिका होती. मी वाल्मीक कराडचे समर्थन कधी केलेच नव्हते. जयंत पाटलांनी देखील भाषणात वाल्मिक कराड यांचं कौतुक केलं होतं. मग धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असला म्हणून काय झालं सगळ्यांना सारखा न्याय देणार का?” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.
“मनोज जरांगे हा जातीयवादी आहे. ज्या पद्धतीने मराठा समाजातील नेत्यांनी संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यापर्यंत न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने ओबीसी नेत्यांनी देखील एकत्र येणे गरजेचे आहे. जालना, बारामती, लातूर येथील ओबीसी तरुणांवर झालेल्या हल्ल्यात मराठा नेते सुरेश धस, अंजली दमानिया आता आवाज उठवणार का?” असं सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
“याप्रकरणी एफ आय आर मध्ये जर धनंजय मुंडे यांचे नाव नसेल तर अटक करा म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. पुरावा असेल तर धनंजय मुंडेला सहआरोपी करा”, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.
बारामतीचा विक्रम गायकवाड, लातूरमधील माऊली अन् जालना प्रकरणी पुढे का आले नाही?
“सरपंच संतोष देशमुख हे मराठा समाजाचे असल्यामुळेच मनोज जरांगे पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं. आरोपींना शिक्षा देण्यापर्यंत प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन. परंतु बारामतीचा विक्रम गायकवाड, लातूरमधील धनगर समाजाचा माऊली सोठ, तसेच जालना जिल्ह्यातील प्रकरणातही शरद पवार, सुप्रिया सुळे, अंजली दमानिया पुढे का आल्या नाहीत?” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
“गोरे यांना पॉलिटिकल टार्गेट केलं जात असेल तर…”
“मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणात न्यायालयापेक्षा मोठे कोणी नाही. कारण तेच प्रकरण पुन्हा पुढे येत असेल, तर जयकुमार गोरे यांना पॉलिटिकल टार्गेट केले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. जयकुमार गोरे यांना पॉलिटिकल टार्गेट केलं जात असेल तर इथून पुढच्या काळात सार्वजनिक जीवनात आमदार, खासदार यांनी आपलं चरित्र धुतल्या तांदळासारखे ठेवणं गरजेचं आहे”, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
