आता राजकीय फटाके फुटणार; ज्यांना.., महायुतीच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, वातावरण तापणार?
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता वातावरण चांगलंच तापलं असून, भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांनी डिवचलं आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षामधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे, त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना डिवचलं आहे, त्यामुळे आता रायगडमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?
महाराष्ट्रासह देशभरात आजच्या दिवशी उत्साहाचे वातावरण आहे. गेले आठ दिवस फटाके फूटत होते, परंतु आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे. जशी जशी उमेदवार डिक्लेअर होतील, त्यावर पुढच्या काही लोकांचं भवितव्य अवलंबून आहे, उमेदवार आणि राजकीय पक्षांचं भवितव्य देखील त्यावरच अवलंबून आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांना देखील खोचक टोला लगावला आहे. पक्षांतरावर बोलताना ते म्हणाले की, रोहा असेल किंवा दुसरं काही असेल, ही काय कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. आव्हान देत असतील तर काही दिवसांमध्ये त्यांना कळेल. आम्ही वरिष्ठांचा आदेश मानण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो वाढवलाच पाहिजे, असं यावेळी गोगावले यांनी म्हटलं आहे.
आमच्याकडे ज्यांना काही पटत नसेल तर ते त्यांच्याकडे जात असतील, त्यांच्याकडे ज्यांना काही पटत नसेल तर ते आमच्याकडे येतात. काही लोक बीजेपीकडे जात असतील, त्यामुळे कोणीही कोणाला कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी मालमत्ता समजू नये, असा टोलाही यावेळी गोगावले यांनी लगावला आहे.
आमच्या नेत्यांकडून आम्हाला महायुतीचा प्रस्ताव आला, तो येत असताना आम्ही दोघे मोठे भाऊ आहोत, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, कारण तीन-तीन सीट आहेत या जिल्ह्यामध्ये. त्यासाठी आम्हीच पहिला प्रस्ताव ठेवलेला आहे, जर कोणाला काय वेगळे वाटत असेल तर आमचची ती पण तयारी आहे, असा थेट इशाराच यावेळी गोगावले यांनी दिला आहे.
