भाजपने डाव टाकला, ठाकरे गटाला जबर हादरा, दोन माजी महापौरांसह शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics: राज्यातील राजकीय पक्ष सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. निवडणूकीच्या तोंडावर आता पक्षांतरालाही सुरुवात झाली आहे. आता जळगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

हिरा ढाकणे, प्रतिनिधी: राज्यातील राजकीय पक्ष सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र निवडणूकीच्या तोंडावर आता पक्षांतरालाही सुरुवात झाली आहे. अनेक नेते नवीन पक्षात प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता जळगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि शेकडो शिवसैनिकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला. त्यामुळे जळगावमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.
दोन माजी महापौरांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगावमध्ये शिवसेनेची ताकद आता कमी झाली आहे. कारण जळगाव शहराच्या दोन माजी महापौरांनी अधिकृतरीत्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजपाचा झेंडा हाती घेतला. यामध्ये माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी महापौर नितीन लढ्ढा यांचा समावेश आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन सुनील महाजन यांनी देखील आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपची ताकद वाढली
महाविकास आघाडीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्री महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणुकीनंतर पक्षातील वाढत्या अंतर्गत मतभेदांमुळे आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमधील नाराजीनंतर त्यांनी अखेर भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
📍 जळगाव
आज जळगाव शहराचे उबाठा गटाचे माजी महापौर श्री. नितीन लढ्ढा, माजी महापौर श्रीमती जयश्री सुनील महाजन यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी… pic.twitter.com/cB7O2ZCaAI
— Girish Mahajan (@girishdmahajan) October 31, 2025
शेकडो कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश
आज झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात, जळगाव शहरातील शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भाजप प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या प्रवेशानंतर जळगावमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आता संघटनात्मक आव्हान निर्माण झाले असून, भाजपासाठी मात्र हा मोठा राजकीय लाभ मानला जात आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
