मनसेला पहिला मोठा धक्का, महाविकास आघाडीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आता घडामोडींना वेग आला असून, मनसेला पहिला मोठा धक्का बसला आहे, महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसेची महाविकास आघाडीसोबत जवळीक वाढल्याची दिसून येत आहे. सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी देखील झाल्याचं पहायला मिळालं, मात्र या युतीबाबत अजूनही काँग्रेसची भूमिका तळ्यामळ्यात असल्याचं पहायला मिळत आहे.
मनसे आणि एमआयएमसोबत आघाडी करणार नाही, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तसेच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीची युती होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे, काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेनंतर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मनसे आणि एमआयएमसोबत आघाडी करणार नाही, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून आघाडीचा प्रस्ताव आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी नाही, मात्र महानगर पालिका निवडणुकांबाबत वेट अँड वॉचची भूमिका आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर वंचित आणि मित्र पक्षांसोबत आघाडी करण्यास मान्यता आहे, मात्र मनसे आणि एमआयएमसोबत युती करणार नसल्याची भूमिका आता काँग्रेसने घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समिकरणं वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे. मनेसशी आघाडी करण्यासंदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला नाही, असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.
