मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंनी गेम फिरवला, बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, महापालिका निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत, येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या, तर त्यानंतर आता महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, या दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचं पहायला मिळालं, काहींनी तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील पक्ष सोडला, त्यामुळे ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक झाली.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या वेळी भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचं पहायला मिळालं होतं, याचा फटका हा सर्वच पक्षांना बसला, मात्र याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला, त्यावरून शिवेसना शिंदे गटानं नाराजी देखील व्यक्त केली होती. मात्र महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपानं शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्यानं हे चित्र बदललं आहे. परंतु आता मोठी बातमी समोर येत असून, शिवसेना ठाकरे गटानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. दरम्यान शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर सहसंपर्क प्रमुख दादा पवारांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर मला घरी आल्यासारखं वाटत आहे, आम्हाला जी आश्वासन शिवसेना शिंदे गटात जाताना देण्यात आली होती, त्यापैकी एकही पूर्ण झालं नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही आलो आहोत. आता मरेपर्यंत शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी दादा पवार यांनी दिली आहे.
