दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजितदादांनी अखेर मनातलं सांगितलं
महापालिका निवडणुकीमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती झाली आहे, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून, यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती, त्यावेळी अनेक बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला. अजित पवार हे त्यावेळी राज्यातील युती सरकारला पांठिबा देऊन सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे दोन गट पडले. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरा राष्ट्रवादी शरद पवार गट, त्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील अजित पवार यांनाच मिळालं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. दरम्यान सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, ते पहाता पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, आणि या निवडणुकीसाठी काही ठिकणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. यावरून पुण्यात मोठं नाराजी नाट्य देखील पहायला मिळालं होतं. याच युतीचं कारण पुढे करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान यावेळी अजित पवार यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवार यांचे फोटो तुमच्या फ्लेक्सवर आहेत, हे आत्तापुरत आहे की, कायमस्वरुपी असंच राहणार आहे? क्षणाचाही विलंब न करता या प्रश्नाला उत्तर देताना तुझ्या तोंडात साखर पडो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या या उत्तरामुळे पुन्हा एकदा आता दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणार का? अशा चर्चेला उधाण आलं आहे.
मुंबईत स्वबळावर
दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक अजित पवार गटाने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून इथे नवाब मलिक यांच्या नावाला विरोध झाला होता, त्यानंतर अजित पवार गटाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला.
