मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार? तो निर्णय ठरणार गेमचेंजर
महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, मोठी बातमी समोर येत आहे.

महापालिका निवडणुका आता संपल्या आहेत, महापालिका निवडणुकीमध्ये राज्यात भाजपला मोठं यश मिळालं, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. या महापालिका निवडणुकांसाठी यावेळी भाजपनं अनेक महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत युती केली. तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं मात्र काही निवडणुका या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर काही ठिकणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं युतीमध्ये लढवली . दरम्यान या महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीला मोठा फटका बसला, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं भाजपसाठी काटे की टक्कर असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र हा अंदाज देखील चुकला, दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्यापासूनच पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या घड्याळ चिन्हावर लढवणार आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर एकत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसह चंदगड व आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांच्यामध्ये समझोता झाला आहे. यावेळी या दोन्हीही नेत्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांनी आगामी निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
