जालनात ढगफुटी सदृश्य पाऊस, त्यात कोल्हापूरी बंधारा फुटला….
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रोशनगाव बाजार वाहेगाव धोपटेश्वर आणि आसपासच्या पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची बातमी आहे. काही तासांतच मोठा पाऊस झाल्यामुळे सुकना नदीला दुथडी भरुन वाहत आहे.
जालनातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात मंगळवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून या पावसाने ओढे नाले नदी यांना पूर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याच दरम्यान, पावसाने सुखना नदीवरील कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा फुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात सुखना नदीला मोठा पुर आल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहत आहे.
शेतांना तळ्याचे स्वरुप
जालनाच्या बदनापूर तालुक्यातल्या रोशनगाव- नानेगाव बाजार, वाहेगाव कुसळी आणि यासह आसपासच्या पट्ट्यात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसरातील छोटे मोठे ओढे आणि नद्यांनाही मोठा पूर आला आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतातही तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
कोल्हापूरी बंधारा फुटल्याने पूर
जालना येथील बदनापूर तालुक्यातल्या नानेगाव या ठिकाणी सुखना नदीवरील असलेला कोल्हापुरी बंधाराही फुटला आहे. पावसाचा जोर अधिकच असल्याने सुखना नदीला पुर येऊन ती दुथडी भरून वाहत आहे आणि पाण्याचा प्रवाह मोठा आणि वेग जास्त असल्याने हा बंधारा फूठला असावा असे म्हटले जात आहे त्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी पाणीच पाणी वाहत असून नागरिकांची त्रेधातिरपिठ उडाली आहे.
पाऊस पुन्हा ब्रेक घेणार ?
मुंबई आणि राज्यभरात मान्सूनचे १६ दिवस आधीच आगमन झाल्यानंतर गेले काही दिवसांपासून पावसाने राज्याला झोडपायला सुरुवात केली आहे. मंगळवारी मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील लातूर आणि जालना या काही भागात अजून पाऊस सुरुच आहे. या पावसाने मुंबईतील मे महिन्याच्या २६ तारखेला १०७ वर्षातला रेकॉर्ड मोडला आहे. आणखी काही दिवस मोठा पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. आता पाऊस थोडा लांबणार असल्याचे भाकित वेध शाळेने केले आहे. अफगाणिस्तान आणि रशियातून येणाऱ्या वाऱ्यामुळे पाऊस थोडा लांबणार असल्याचे म्हटले जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

