
Thane Municipal Corporation Election 2026 : सध्या महापालिका निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यभरात प्रचाराला वेग आला आहे. ठाणे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी तर राज्यातील बड्या नेत्यांनी या ठिकाणी सभांचा धडाकाच लावला आहे. आज (7 जानेवारी) ठाण्यातील ‘आपलं ठाणे आपला देवाभाऊ’ या मुलाखतपर कार्यक्रमात बोलताना ठाण्यातील विकासकामाबद्दल सांगितलं. तसेच आगामी वर्षात ठाण्यात कोणती विकासकामे केली जातील? दळणवळणाच्या सुविधांचा विस्तार कसा केला जाईल? याचा विस्तृत आराखडा मांडला. भविष्यात सर्व लोकल एसी असतील. विशेष म्हणजे एसी लोकल असल्या तरीही तिकीट मात्र वाढणार नाही, असे फडणवीसांनी सांगितले.
“मुंबई आणि एमएमआरमधील लोकांचा राहण्याचा आणि दळणवळणाचा प्रश्न सोडवता आला तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असे मानता येईल. दळणवळणाच्या दृष्टीने आपण अनेक गोष्टी केल्या आहेत. 2014 सालानंतर माझ्याकडे राज्याचा कारभार आला तेव्हा आम्ही 5 पाच वर्षात 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं आणि कामही सुरू केलं. पुन्हा आमचे सरकार गेल्यानंतर यातील काही कामावर स्थगिती देण्यात आली होती. पुन्हा एकनाथ शिंदे यांचे सरकार आले. आम्ही पुन्हा काम चालू केलं,” असं फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितले. तसेच आम्ही आतापर्यंत 200 किमीचं काम पूर्ण केलं. आम्ही प्रत्येक वर्षाला 50 किमीचं काम पूर्ण करणार आहोत.एकूण 400 किमीचं काम आम्ही 2028 सालाच्या शेवटपर्यंत आम्ही पूर्ण करू. सोबतच 2030 सालापर्यंत आम्ही मेट्रोचं पूर्ण नेटवर्क पूर्ण करू,” असे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले.
आपण ठाण्याला मुंबईकडे, कल्याण-भिवंडीकडे कनेक्टिव्हीटी दिली आहे. त्यासोबतच तीन, चार, पाच मेट्रो ठाण्याशी कनेक्ट केलेल्या आहेत. ठाण्याच्या रिंग मेट्रोचाही प्रस्ताव आपण मान्य केला आहे. ठाणे कदाचित हे पाहिले शहर असेल जिथे पूर्ण रिंग मेट्रो असेल. फक्त मेट्रो करूनच आपण थांबलेलो नाहीत. आपण मेट्रो आणली आहे. ती खूप सुंदर आहे. एसी डबे आहेत. परंतु लोकलही तेवढीच महत्त्वाची आहे, असे सांगून त्यांनी ठाणेकरांसाठी लोकलच्या रेल्वेमध्ये काय सुधारणा करता येईल याबाबत सांगितले.
“लोकलला लटकून, कसरत करत खूप वर्षे काढली आहेत. परंतु मोदीजींच्या नेतृत्त्वात आपण लोकलचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले आहेत. स्टेशन चांगले केले आहेत. स्वच्छता वाढवलेली आहे. एवढं सारं करूनही आता पुढच्या काळात सर्व लोकलला मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे तयार करत आहोत. या सर्व लोकल एअर कंडिशन असतील. विशेष म्हणजे एवढं सारं करूनही लोकलचं सेकंड क्लासचं तिकीट सध्या जेवढं आहे तेवढंच असेल. त्यामुळे ई-बसेस घेत आहोत. प्रदूषण कमी करण्याचा यातून प्रयत्न आहे. मुंबईत सिंगल अॅपवर सिंगल तिकिटात कोणत्याही सर्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येतो. आता एमएमआर रिजनच्या कुठल्याही महापालिकेत कुठेही गेले तरी एकाच तिकिटावर प्रवास करता येईल, अशी सोय आम्ही करणार आहोत,” असे फडणवीसांनी सांगितले.