मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज, यादी जाहीर होण्यापूर्वीच केली मोठी घोषणा
आता राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निश्चित केली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आता राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निश्चित केली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपने एक पाऊल पुढे टाकत सर्वात आधी विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातून नागपूर द. पश्चिमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर दक्षिणमधून मोहन मते, नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जवळपास ९९ जणांची नावे उमेदवारी जाहीर केली आहे.
एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज
त्यानतंर आता महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडूनही विधानसभेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून आज साधारण ३० ते ४० जणांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सांगितली आहे. येत्या २४ ॲाक्टोबरला एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील.
एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठ्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे समर्थक ठाण्यातील रस्त्यावर गोळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार असल्याचे बोललं जात आहे.
राज ठाकरे आणि एकनाथ शिेदेंची महत्त्वाची बैठक
दरम्यान दुसरीकडे मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. शिवडी, वरळी, माहीमसह काही जागांवर महायुती राज ठाकरेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर राज्याच्या राजकारणात त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.