
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. राज्यातील प्रमुख नेते प्रचारात व्यस्त आहेत. आज ठाण्यात ठाणे वैभव वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले आहे. या मुलाखतीत फडणवीस यांना ठाण्याच्या वाहतुकीबाबत आणि बुलेट ट्रेनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीस नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
ठाण्यातील वाहतूक कोंडीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, MMR क्षेत्रात वाहतुकीचा प्रश्न आहे, तो सुटला पाहिजे. जुन्या सरकारच्या काळात 11 किलो मीटर मेट्रो होती, आपण आता 415 किलोमीटर मेट्रो सुरू केली. 475 पैकी 50 किलो मीटर टप्यात काम करत आहे. रिंग मेट्रो देखील ठाण्यात होत आहे. सबर्बन रेल्वेत अनेक जण लटकून कसरत करत प्रवास करतात, मात्र आता सर्व डबे वातानुकूलित आणि बंद असणार आहेत.
ठाणे रिंग मेट्रो प्रथम सुरू होणार की बुलेट ट्रेन ? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही प्रकल्प जवळपास एकाचवेळी सुरू होतील, कारण दोन्ही प्रकल्पांमध्ये स्पर्धा सुरू आहे. बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती. पण मध्यंतरीच्या काळात उद्धवजींना बुलेट ट्रेनचा राग आला, त्यांनी त्याला स्थगिती देऊन टाकली. यामुळे सगळी कामे थांबली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्टात स्थगिती मिळाली, पण गुजरातच्या बाजूला काम सुरू होतं, मात्र महाराष्ट्राच्या बाजूला काम बंद होतं. शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. सगळ्या स्थगित्या आम्ही दूर केल्या. पटकन जमीनीचे अधिग्रहण केलं. आता अत्यंत वेगाने आमचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित पहायला मिळेल.