चला कठीण काळात…! अजिंक्य रहाणे शेतकऱ्यांसाठी मनातलं बोलला
राज्यातील आस्मानी संकट कोसळलं आहे. शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा स्थितीत त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. सरकार मदत करत आहे. पण क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने मदतीचा हात पुढे केला आहे.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला शेतकऱ्यांचा व्यथा माहिती आहेत. मागच्या काही दिवसात राज्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याचा अंदाज आहे. यापूर्वीही त्याने शेतकऱ्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकून वेदना होत असल्याचं देखील त्याने यापूर्वी बोलून दाखवलं आहे. आपले शेतकरी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हे खरे हीरो आहेत, असंही त्याने वारंवार सांगितलं आहे. असा बळीराजा आता आस्मानी संकटात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पिकाचं आणि शेतमालाचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. याची जाणीव अजिंक्य रहाणेला आहे. त्यामुळे त्याने लगेच पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने शेतकऱ्यांना मदतीचं आव्हान केलं आहे. ‘आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं आहे आणि होत आहे. तुम्ही हे वाचलं असेल आणि ऐकलंही असेल. मी स्वत: एका शेतकरी कुटुंबातला आहे. त्यामुळे जाणीव आहे की शेतकऱ्यांना किती त्रास होत असेल. वर्षानुवर्षे शेतकरी आपल्या शेतात मेहनत करत असतो. जे काही आपल्या ताटात असतं ते शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे.’
‘सरकार आपल्या परीने मदत करत आहे. पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहीजे. आपल्याकडून जी काही मदत करता येणं शक्य आहे ती करा. मी माझ्याकडून नक्कीच मदत करत आहे. पण माझं तुम्हाला सांगण की तुमच्याकडून जी मदत होईल ती करा.’ , अजिंक्य रहाणेनं असं सांगत मदतीचं आवाहन केलं. अजिंक्य रहाणेच्या या आवाहानातून त्याची तळमळ दिसून येत आहे.
