Ajit Pawar Death : ती भेट शेवटची, क्षणोक्षणी वाटतंय त्यांचा फोन येईल आणि म्हणतील… भाजप नेत्याची भावूक प्रतिक्रिया
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या भीषण अपघातात वैमानिकासह ५ जणांचा मृत्यू झाला असून, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दादांच्या शेवटच्या भेटीचा भावूक फोटो शेअर केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील कर्मचारी आणि वैमानिकांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामतीसाठी चार्टर्ड विमानाने निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की यातील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानंतर आता हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील एक फोटो शेअर करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या शेवटच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट
कालची दादांची आणि माझी शेवटची भेट… पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आम्ही सर्व उपस्थित होतो. नेहमीप्रमाणे दादांचा आत्मविश्वास, मिश्कीलपण आणि कामावरील पकड तशीच होती. कोणालाही कल्पना नव्हती की ती भेट शेवटची ठरणार आहे. आजही दादांच्या नसण्याची कल्पना मनाला मान्य होत नाही. क्षणोक्षणी वाटत राहते आता दादांचा फोन येईल, एखाद्या मुद्द्यावर ठाम शब्दांत चर्चा करतील, नेहमीसारखं हसत म्हणतील, चला, कामाला लागूया…
दादा… आपली ही धक्कादायक एक्झिट आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा, निर्णयक्षम नेतृत्वाचा आधार अचानक हरपल्याची पोकळी शब्दांत मांडता येणार नाही. तुमची आठवण नेहमी येईल, तुमची उणीव नेहमी जाणवत राहील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कालची दादांची आणि माझी शेवटची भेट…
पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्यासमवेत आम्ही सर्व उपस्थित होतो. नेहमीप्रमाणे दादांचा आत्मविश्वास, मिश्कीलपण आणि कामावरील पकड तशीच होती. कोणालाही कल्पना नव्हती की ती भेट शेवटची ठरणार आहे.… pic.twitter.com/yc93hXT8mF
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 28, 2026
तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अनेक कार्यकर्ते आणि नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे बारामती आणि बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून सर्व सरकारी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
