प्रकाश आंबेडकरांकडून राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस यांची टीका
भीमा-कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी लिहीले होते.
मुंबई : प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आंबेडकर अशी वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले. भीमा-कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी लिहीले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलं होतं.
त्यावेळी माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलिस अधिक्षक यांचीसुद्धा विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचं आंबेडकरांनी नमूद केलं होतं. प्रकाश आंबेडकरांना ५ जून रोजी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगाने बोलावलं होतं. त्या पत्राला उत्तर देताना पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण ५ जूनला येऊ शकत नसल्याचं त्यांनी आयोगाला कळवलं होतं.
परदेशी गुंतवणूक येण्यात महाराष्ट्र नंबर 1
मुंबईतील लहान बालकांसांठी किलबिलाट ॲम्ब्युलन्सचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येत आहे. परदेशी गुंतवणूक येण्यात महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आमचं सरकार असताना राज्यात गुंतवणूक सर्वात जास्त होती. मात्र आम्ही गेल्यानंतर 2020 ते 2022 या काळात राज्यात परदेशी गुंतवणूक कमी झाली होती. आता आम्ही पुन्हा आलो आहोत. आमच्या सरकारने महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणलं, असा दावाही फडणवीस यांनी केला. त्यामुळे आता विरोधकांनी तोंड बंद करावं असं त्यांनी खडसावलं.
दरम्यान यावेळी फडणवीसांनी गुंतवणूक कराराबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रोजेक्ट (PSP)च्या संदर्भात १३ हजार ५०० मेगावॅटचे करार केंद्र सरकारची एनएचपीसी आणि खाजगी क्षेत्रातील टॉरेंट पावर या दोन कंपन्यांशी केले आहेत. तसेच यातून जवळपास ७१ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे अशी माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.