तुला नांदायचं असेल तर… नणंदेचे एक वाक्य अन् गौरीची आत्महत्या? अंजली दमानियाच्या विधानाने खळबळ
पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत अनंत गर्जे व त्यांच्या कुटुंबीयांवर छळ आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले आहेत.

मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी आता गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी त्यांनी गौरीच्या नणंदेवरही एक आरोप केला आहे.
अंजली दमानिया यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी डॉ. गौरी या खंबीर होत्या. त्यामुळे तिने आत्महत्या केली असेल यावर शंका आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी गौरीची नणंद अनंत गर्जेची बहीण शीतल आंधळेवर गंभीर आरोप केले आहेत. शीतल आंधळे अनेकदा गौरीला तुला नांदायचं असेल तर नांद नाही तर आम्ही दुसरं लग्न करून देऊ, असे गौरीला बोलायच्या, असा आरोन दमानिया यांनी केला आहे.
गौरीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात, अनंत भगवान गर्जे, शीतल आंधळे (बहीण), आणि दीर अजय भगवान गर्जे हे तिघे आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी गौरीची आत्महत्या आहे की घातपात याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गौरीच्या आई-वडिलांना घटनास्थळी पोहोचायला वेळ लागल्याने एफआयआर दाखल होण्यास विलंब झाला. सकाळी ३.३० वाजता आल्यानंतर सकाळी ११ वाजता एफआयआर दाखल झाला, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
दोघांमध्ये सतत वाद
गौरीच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूनंतर अनेक दावे केले आहेत. तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद आणि छळ हे कारण असल्याचं बोललं जात आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय गौरी यांना होता. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अनंत गर्जे मुलींसोबत चॅटिंग करत असल्याचे गौरीच्या लक्षात आले होते. तिने माफ केल्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होते, असा आरोप गौरीच्या मामांनी केला आहे.
डॉ. गौरी पालवे-गर्जे आणि अनंत गर्जे यांचा विवाह याच वर्षी ७ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. त्यांच्या लग्नाला अवघे १० महिने पूर्ण होण्याआधीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी त्यांचे नियोजित दौरे रद्द केले आहेत. गौरीच्या मामांनी पंकजा मुंडे यांचा या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे .
