मोठी बातमी! …तर गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर काय दिली प्रतिक्रिया?
मनोज जरांगे यांनी उपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारने काही निर्णय घेतले. याच निर्णयांवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Gunratan Sadavarte On Maratha Reservation : गेल्या पाच दिवसांपासून चालू असलेले मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण आता थांबले आहे. सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठवाड्यातील मराठा समाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठीदेकील सातारा गॅझेट लागू केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने एका महिन्याचा कालावधी मागितला आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेदेखील मागे घेतले जातील, असे आश्वासन सरकारने दिले आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप व्यक्त करत थेट न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
सदावर्ते यांनी घेतला आक्षेप
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असे लेखी आश्वासन मनोज जरांगे यांना दिले आहे. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे यांची भेट घेतली. तसेच सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसूदा दिला. याच कागदपत्रांत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचेही सरकारने मान्य केल्याचे नमूद आहे. सदावर्ते यांनी मात्र सरकारच्या या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील तर इतर सर्वच आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे सदावर्ते म्हणाले आहेत.
तर मंत्र्यांनाही कोर्टात खेचणार
आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांना मारहाण झाली. अशा प्रकारचे गुन्हे मागे तर घेऊन पाहू द्या. पोलिसाचा मुलगा म्हणून मी सांगतो की पोलिसांना मारहाण केलेले गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाहीत. हे गुन्हे सरकार परत घेऊ शकत नाही. असे गुन्हे मागे घ्यायला न्यायालयाची परवानगी लागते, असा कायदाच गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितला. तसेच जरांगे आणि मराठा लीडरशिपमुळे मारहाण केलेले गुन्हा मागे घेतले गेले तर मी न्यायालयात जाणार. तसेच ज्यांच्या दबावामुळे हे गुन्हे मागे घेतले जातील त्या सगळ्या मंत्र्यांनाही मी प्रतिवादी करून न्यायालयामध्ये उभे करणार आहे, असा थेट इशाराच सदावर्ते यांनी दिला.
दरम्यान, आता सदावर्ते यांनी सांगितलेल्या कायद्यामुळे तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यास थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिल्यामुळे पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
