ऊसतोडणी संपली, आता सुखाचे दिवस येतील असं वाटलं तोच… सोलापुरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना
महाराष्ट्रात अपघातांचे सत्र सुरूच असून सोलापूर-पुणे महामार्ग आणि बुलढाणा येथे झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरमध्ये केमिकल टँकरने कुटुंबाला चिरडले, तर बुलढाण्यात एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत ३ तरुण ठार झाले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर पंढरपूर पुलाजवळ आज पहाटे ३ च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका भरधाव केमिकल टँकरने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील आई, वडील आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून ऊसतोडणीचा हंगाम संपवून आपल्या गावाकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील हे ऊसतोड कामगार कुटुंब आपल्या दुचाकीवरून गावी जाण्यासाठी निघाले होते. पहाटे ३ च्या सुमारास जेव्हा त्यांची दुचाकी पंढरपूर पुलाजवळ आली. तेव्हा समोरून येणाऱ्या एका वेगवान केमिकल टॅंकरने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिघेही महामार्गावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे तिघांनीही घटनास्थळीच प्राण सोडले.
या अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. टेंभुर्णी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला.
या प्रकरणी केमिकल टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या याचा अधिक तपास टेंभुर्णी पोलीस करत आहेत. मात्र या अपघातामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुलढाण्यात अपघात
बुलढाणा जिल्ह्यात सध्या अपघातांची जणू मालिकाच सुरू आहे. बुलढाणातील करडी (धाड) पुलावर एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. छत्रपती संभाजीनगरकडून मलकापूरकडे जाणाऱ्या मलकापूर आगाराच्या एसटी बसने समोरून येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी थेट बसखाली अडकून फरफटत गेली, ज्यामध्ये दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे अशी या तिघांची नावे होती.
भरधाव वेगातील एसटी आणि दुचाकीच्या या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे तिन्ही तरुणांचा जागीच अंत झाला आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या गावातील तीन तरुण मुलांचा अशा भीषण अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच ढालसावंगी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
