दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. पुढच्या वर्षी दहावीची परीक्षा 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 पर्यंत, तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या काळात होणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा लवकर वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करणं सोपं होणार आहे. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर 2017 रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

परीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं असलं तरी ते छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळातर्फे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येतात.

दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा जशा दरवेळी सोशल मीडियावरुन व्हायरल होतात, तसंच वेळापत्रकही चुकीच्या पद्धतीने व्हायरल होतं असतं. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास न ठेवता थेट वेबसाईटवर जाऊनच वेळापत्रक पाहणं फायद्याचं आहे.

Published On - 6:39 pm, Thu, 22 November 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI